मुंबई : एनआयटी भूखंडावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप झालेले असताना आता दिशा सालीयन मृत्यू प्रकरणावरून (disha salian case) युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर आरोप केले गेले आहेत. या प्रकरणावरून आज विधानसभेत मोठा हंगामा झाला. यावर बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. (False allegations against Aditya Thackeray).
राहुल शेवाळे यांना बोलण्याचा अधिकार आहे का? :खासदार संजय राऊत म्हणाले की, अचानक हा विषय रंगवण्यात आला आहे. यात काही चौकशीची मागणी झाली आहे. एसआयटी गठीत करण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची संबंध जोडला गेला आहे, पण प्रश्न इतकाच आहे की खासदार राहुल शेवाळे यांना हे बोलण्याचा अधिकार आहे का? ते कालपर्यंत शिवसेनेत होते. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे. सीबीआयने स्वतः त्याबाबत क्लोजर रिपोर्ट दिला आहे व ती आत्महत्या असल्याचे स्पष्ट केलं आहे. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांबरोबर, बिहार पोलिसांनी सुद्धा केला. भाजप ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने तपास झालेला आहे. तरीसुद्धा हा पूर्ण तपास झाल्यानंतर सिद्ध झालं की ती आत्महत्या होती. त्यासोबत इतरही विषय जोडले गेले. तरीसुद्धा काल हा विषय महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत नेण्यात आला. याला कारण दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नागपूर एनआयटी मध्ये केलेला घोटाळा व त्यामुळे त्यांच्यावर लटकत असलेली टांगती तलवार, त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी जाणून बुजून हा विषय काढण्यात आल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.