मुंबई -कोरोना विषाणूवर मात करताना राज्य सरकारकडून चुका होत आहेत. चाचणी कमी करून ही लढाई कधीही जिंकता येणार नाही. परिस्थिती काळजीची आहे. मी टीका करीत नाही तर केवळ सूचना करतो आहे. मात्र, सध्या राज्य सरकार कोरोनाशी नाही, आकडेवारीशी लढते आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाराष्ट्र जनसंवाद रॅलीला देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. यावेळी ते बोलत होते. या सभेला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, विनोद तावडे, राज्यसभा खासदार नारायण राणे आदी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस (विरोधी पक्षनेते, विधानसभा) यावेळी ते म्हणाले, सतत संवाद ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी उपलब्धी आहे. सातत्यपूर्ण संवाद हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे. कोरोनाच्या काळातही संवादच उत्तम माध्यम राहिले. टाळेबंदी असली तरी केलेल्या कामाचा जनतेला हिशोब देण्याचे काम यातून साध्य होत आहे. मुंबई आणि कोकणातील भाजपा कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या काळात अतिशय मोठे सेवा कार्य केले, त्याचा अभिमान असल्याचेही ते म्हणाले.
काही कार्यकर्त्यांचा समाजासाठी काम करताना प्राण सुद्धा गेला. पक्ष त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहे. कोकणात निसर्ग चक्रीवादळ आले. तेव्हाही शासनाची मदत पोहोचण्यापूर्वी भाजपची मदत पोहोचली. मजबूत नेता असला की किती वेगाने काम होऊ शकतात, याचा आदर्श पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिला, असे ते म्हणाले.
हेही वाचा -सीमा सुरक्षेसाठी प्रश्न विचारणे हे राजकारण नव्हे तर जबाबदारी - बाळासाहेब थोरात
कोरोनाच्या काळात प्रत्येक घटकासाठी अतिशय भक्कम काम पंतप्रधानांनी केले. कापूस खरेदी होत नसताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भक्कम पाठपुरावा केला. मात्र, राज्य सरकारने त्याचा लाभ घेतला नाही. आज लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) मोठ्या प्रमाणात मदत केली जात आहे. ५० हजार उद्योगांना ४ हजार कोटींवर मदत मिळाली आहे.
ते पुढे म्हणाले, निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना आपली मदत तर पोहोचली. मात्र, सरकारची क्षमता अधिक असते. तरी अजूनही शासकीय मदत पोहोचली नाही. अजून अनेक भागात वीज आलेली नाही. अनेक मंत्री केवळ केंद्र सरकारवर टीका करण्यात धन्यता मानतात. त्यांचे कर्तृत्व शून्य आहे. वीज बिले सावकारांप्रमाणे पाठविण्यात आले आहे. यामुळे जनता त्रस्त असा आरोपही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हर्चुअल रॅलीत राज्य सरकारवर निशाणा साधला.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही या व्हर्चुअल रॅलीला संबोधित केले. महाराष्ट्र सरकार का कांग्रेसीकरण हुआ इसीलिए साधुओं की हत्या....
तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, आणीबाणीच्या काळात काँग्रेसची संस्कृती संपूर्ण देशाने पाहिली आहे. तीच परिस्थिती आजही दिसत आहे. महाराष्ट्रात सरकारचे काँग्रेसीकरण झाले यामुळेच पालघरमध्ये साधुच्या मॉब लिचिंगच्या माध्यमातून हत्या झाली, असा आरोप त्यांनी केला. ज्या नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्या नागरिकांचे या संवादाच्या माध्यमातून आभारही त्यांनी यावेळी व्यक्त केले. काँग्रेसचे नेते मागील 70 वर्षात एकही पीपीई कीट बनवू शकले नाहीत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगातील क्रमांक दोनचा पीपीई कीट उत्पादक असलेला देश बनला आहे. भाजपचे नेतृत्व, सर्व कार्यकर्ते कोकणच्या नागरिकांच्या सोबत आहेत, असा विश्वासही त्यांनी कोकणच्या नागरिकांना दिला.