मुंबई - महाराष्ट्र शासनाचा जनसंपर्क विभाग, सत्ताधारी पक्ष शिवसेनेचे मुखपत्र सामना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे खाते आणि राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत पेज या चारीवरून एकाच दिवशी नमूद केलेल्या गरजूंना धान्य वाटप आकड्यांमध्ये तफावत दिसत आहे. ही महाराष्ट्राच्या जनतेची एकप्रकारची दिशाभूल नाही का? असा प्रश्न भाजप महाराष्ट्रने आपल्या ट्विटर अकाउंटवरून विचारला आहे.
धान्य वाटपाच्या आकड्यात तफावत, ही महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल नाही का? भाजपचा प्रश्न - धान्य वाटपाच्या आकड्यात तफावत
लोकांना धान्य वाटपासंदर्भात सर्वांनी दिलेल्या आकड्यात फरक आहे. त्यामुळे कोणती आकडेवारी खरी..? आकड्यात घोळ आहे, असे म्हणत विरोधी पक्षातील भाजपने सरकारवर निशाणा साधला आहे.

आजपर्यंत ५ कोटी ९ लाख गरजूंना ३८ हजार क्विंटल धान्य वाटप झाले आहे. त्याचबरोबर ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्यांनाही योग्य ती मदत केली जात आहे, असे शरद पवारांनी ट्विट करत माहिती दिली. तसेच राष्ट्रवादीच्या ट्विटरवर माहिती देण्यात आली की, १ ते १५ एप्रिल २०२० या पंधरा दिवसात राज्यातील १ कोटी ३५ लाख ५४ हजार ४४१ शिधापत्रिका धारकांना तब्बल ४३ लाख ५९ हजार ७९८ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले, अशी माहिती दिली आहे.
तसेच सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या 'सामना' मुखपत्रातून 6 कोटी 80 लाखांची माहिती देण्यात आली. 'डिजीपीआर'कडून 1 कोटी 34 लाख लोकांना धान्य वाटपाची माहिती देण्यात आली. सर्वांनी दिलेल्या आकड्यात फरक आहे. त्यामुळे कोणती आकडेवारी खरी..? आकड्यात घोळ आहे, असे म्हणत विरोधी पक्षातील भाजपने सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारमध्ये कुठेच समन्वय नाही. ही महाराष्ट्राच्या जनतेची एकप्रकारची दिशाभूल नाही का? असे भाजपने ट्विट करत म्हटले आहे.