मुंबई - नागपूर, धुळे, नंदुरबार, पालघर, वाशिम आणि अकोला या ६ जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत. यामध्ये विदर्भात भाजपने प्रतिष्ठेची केलल्या नागपूर जिल्हा परिषदेचा निकाल धक्कादायक आला असून भाजपचा दारुण पराभव झाला आहे. ज्या नागपुरात भाजपचे दिग्गज नेते आहेत, जो भाजपचा गड मानला जात होता त्याच गडात भाजपचा मानहानीकारक पराभव झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तर दुसरीकडे धुळ्याची सत्ता खेचून आणण्यात भाजपला यश आलं आहे. पालघरमध्ये शिवसेनेने मुसंडी मारली आहे.
राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेने आता भाजपच्या गडालाचा सुरूंग लावला आहे. राज्यातील ६ जिल्हा परिषदेमध्ये धुळे वगळता इतर पाचही जिल्हा परिषदेमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या जोरावर हुरळून गेलेल्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीचा जनादेश मागितला. मात्र, त्यावेळी पवारांचे राजकारण संपले असे सांगणाऱ्या नेत्यांना पवारांनी आपला राजकीय अनुभव पणाला लावत महाविकास आघाडीची मोट बांधून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. शेवटी भाजपला जास्त जागा मिळाल्या असतानाही माजी मुख्यमंत्री फडणवीसांना विरोधी बाकावर बसावे लागले.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जुळलेले गणित आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही भाजपला डोईजड जात आहे. राज्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीमध्ये महाविकास आघाडीच्या फॅक्टरमुळे भाजपला सत्ता काही जिल्हा परिषदेतून गमवावी लागली. तर आज निकाल लागलेल्या ६ जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीतही भाजपला ५ ठिकाणी दारून पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. राज्यातून सत्ता गेल्यानंतर स्थानिक स्वराज्या संस्थेच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने मोठ्या प्रमाणात जोर लावला होता. मात्र, धुळे जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्याखेरीज भाजपच्या हाती फारसे यश आले नाही.
नागपूर जिल्हा परिषदेत तर निवडणूक प्रचारासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, फडणवीस यांनी प्रचारांचा झंझावात केला. मात्र, ज्या नागपूरला भाजपचा गड समजला जातो, त्याच गडात भाजपचा दारूण पराभव झाल्याने, भाजपच्या पतनाला सुरुवात झाली असल्याची टीका आता राजकीय वर्तुळातून होऊ लागली आहे. तसेच नागपूर जिल्हा परिषद निवडणूक वारंवार पुढे ढकलली जात होती. भाजप निवडणुकीला टाळत होती. मात्र आज निवडणूक झाली. जनतेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या पारड्यात आपले मत टाकले आहे. विदर्भात भाजपचा आज पराभव झाला आहे. ज्या नागपुरात भाजपचे दिग्गज नेते आहेत, जिथे भाजपची चांगली कमांड होती, आज त्याच नागपुरात भाजपचा पराभव झाल्याची टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.
गडकरींच्या गावातही भाजप उमेदवार पराभूत-