महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'साठेबाजाला वाचवण्यासाठी भाजपा नेते जातात, याचा अर्थ काहीतरी काळेबेरे आहे'

रेमडेसिवीरचा साठा करणार्‍या ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया याला बीकेसी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील भाजपा का घाबरली आहे, राज्यातील भाजप वकिली करण्यासाठी का जाते, याचे उत्तर भाजपने जनतेला द्यायला हवे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

nawab malik statement on devendra fadnavis
nawab malik

By

Published : Apr 18, 2021, 3:30 PM IST

Updated : Apr 18, 2021, 4:44 PM IST

मुंबई -रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्यातमध्ये दोन विरोधी पक्षनेते आणि दोन आमदार साठेबाजाला वाचवण्यासाठी जातात, यामागे काहीतरी काळंबेरं आहे, असा संशय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. तसेच राज्यात रेमडेसिवीरचा साठा मिळू नये, यासाठी भाजपा प्रयत्नशिल असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. रेमडेसिवीरचा साठा करणार्‍या ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया याला बीकेसी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील भाजपा का घाबरली आहे, राज्यातील भाजपा वकिली करण्यासाठी का जाते, याचे उत्तर भाजपने जनतेला द्यायला हवे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

रेमडेसिवीर विकण्यासाठी मागितली होती परवानगी -

देशात आणि राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा असताना या निर्यातीवर केंद्राने बंदी घातली आहे. देशात ७ कंपन्यांना देशातंर्गत विक्रीची, तर दोन कंपन्यांना परदेशात विक्रीची परवानगी दिली आहे. याउलट १७ कंपन्यांना निर्यात करण्याची परवानगी आहे. याच कंपन्या परदेशात विक्री करणाऱ्या दोन कंपन्यांना निर्यात करत आहेत. निर्यातबंदी घातल्यानंतर ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांनी राज्यसरकारशी संपर्क साधला. तसेच आमच्याकडे रेमडेसिवीरचा साठा आहे, तो विकण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासोबत राजेश डोकानिया यांनी भेट घेतली होती, असेही मलीक यांनी सांगितले.

ठेकेदाराला सोडवण्यासाठी विरोधी पक्षनेते धावले -

पोलिसांना निर्यात करणार्‍या कंपन्याकडे औषधाचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारावर राजेश डोकानिया यांना पोलिसांनी चौकशीसाठी बीकेसी येथील पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यांच्याकडे माहिती गोळा करण्याचे काम पोलीस करत असतानाच रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार पराग अळवणी पोचले. डोकानियाला सोडवण्यासाठी राज्याचे दोन विरोधी पक्षनेते व दोन आमदार का गेले, असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच ज्यांच्याकडे साठा आहे, ते स्वतः खरेदी करून आणि स्वतः विकू, अशी भूमिका भाजप घेत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे.

पोलीस यंत्रणा जनतेसाठी काम करते -

शनिवारी सगळा प्रकार झाल्यावर एफडीएने रात्री दहा वाजता परवानगी दिली होती. त्याची कॉपी दाखवल्यावर राजेश डोकानिया यांना माहिती घेऊन सोडून दिले. गरज पडल्यास पुन्हा बोलावू, असे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस यंत्रणा जनतेसाठी काम करते. काळाबाजार रोखण्यासाठी काम करते. साठा असेल तो जप्त करून लोकांना दिला पाहिजे, या भूमिकेतून काम करते, असेही नवाब मलिक म्हणाले.

पोलीस स्टेशनमध्ये भाजपची वकीली -

देवेंद्र फडणवीस वकील आहेत. म्हणूनच ते राजेश डोकानियासाठी वकीलपत्र घेऊन त्याची बाजू मांडत होते. राजेश डोकानियाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील भाजपा का घाबरली आहे, असा प्रश्नही नवाब मलिक यांनी केला आहे. राज्याच्या हितासाठी पोलीस आणि राज्याची एफडीए यंत्रणा काम करते आहे. मग दोन तासासाठी चौकशीला पोलिसांनी बोलावल्यावर राज्यातील भाजपाचे प्रमुख जातात, यामध्ये त्यांचा राजेश डोकानियाबरोबर संबंध काय आहे, याचा खुलासा भाजपाने करावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

हेही वाचा - रेमडेसिवीर पुरवठा वाद: ब्रूक्स फार्मा अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

Last Updated : Apr 18, 2021, 4:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details