मुंबई - सोमवारी मुंबईसह उपनगर, नवी मुंबई, ठाण्यातील अनेक भागात सकाळी 10 वाजता वीज प्रवाह अचानकपणे खंडित झाला. मात्र, काही तास उलटल्यानंतर अद्याप काही ठिकाणी वीज नसल्याचे सांगत भाजप नेत्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. बत्तीगुल सरकार गायब! जनतेने शॉक देण्याची वाट पाहताय की काय? असे म्हणत ट्वीट करत भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकारवर टिका केली. तर मुख्यमंत्री म्हणजे पनवती असे म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनीही मुख्यमंत्र्यांना लक्ष केले.
तब्बल 13 तास उलटले तरी मुलुंड,भांडूप परिसरात सुमारे 70% हुन अधिक भाग तर ठाण्याचा 25% भाग अंधारातच असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. ऊर्जा मंत्री, सचिव, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणताच खुलासा नाही. रुग्ण आणि जनता हवालदिल. बत्तीगुल सरकार गायब! जनतेने शॉक देण्याची वाट पाहताय की काय? अशा आशयाचे त्यांनी ट्विट केले.