मुंबई - ठाण्यातील एका जिवंत रुग्णाचे नाव दुसऱ्याला देऊन त्याचा मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला होता. हा प्रकार कुटुंबीयांना उघडकीस आणला. त्यानंतर आज संबंधित कुटुंबीय आणि भाजप नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास राज्यपालांनी समर्थन दिल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.
ठाणे मृतदेह प्रकरण : भाजप नेत्यांसह पीडित कुटुंबीयांनी राज्यपालांची घेतली भेट - ठाणे मृतदेह प्रकरण
कोरोनाचा कहर सुरू असतानाच प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. ठाण्यातही असाच काहीसा प्रकार उघड झाला. बेपत्ता असलेल्या एका रुग्णाचे तीन दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांचा मृतदेह कोपरीतील दुसऱ्याच कुटुंबीयांना देण्यात आला. मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर मात्र प्रत्यक्षात दुसऱ्या कुटुंबातील सदस्य जिवंत असल्याची माहिती समोर आली आहे.
कोविड केअर सेंटरमधून ७२ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मागील दोन दिवसांपासून शोध सुरू होता. या संदर्भात बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. या दरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह कोपरीतील दुसऱ्याच एका कुटुंबाकडे सोपविण्यात आला असल्याची माहिती समोर आली. त्या कुटुंबाने आपला नातेवाईक समजून त्यांच्यावर अंत्यसंस्कारही केले. मात्र, त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य जिवंत असल्याची माहिती त्यांना मिळाल्यावर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोविड रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर त्यांनी रुग्ण बेपत्ता झाल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट केला होता. दरम्यान, या संदर्भात ठाणे मतदाता जागरण अभियानाने पालिका प्रशासनाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी कोविड केअर रुग्णालयात जाऊन येथील डॉक्टरांशी चर्चा करुन ४८ तासांत रुग्णाचा शोध लावण्यास सांगितले होते. अखेर रात्री उशिरा या रुग्णाचा शोध लागला. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. संबंधित रुग्ण हा सुरुवातीला कळवा रुग्णालयात दाखल होता. त्यांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयाने त्यांना महापालिकेच्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले. तशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देखील देण्यात आली. त्यानुसार त्यांचे कुटुंबीय रुग्णालयात चौकशीसाठी देखील गेले होते. परंतु, त्या नावाचा व्यक्ती तेथे नसल्याचे दिसून आले. त्यानंतर मागील दोन दिवसापासून ठाणे मतदाता जागरण अभियान, भाजप यांच्या माध्यमातून त्यांच्या शोधासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु, त्यांचा काही केल्या शोध लागत नव्हता.
या पार्श्वभूमीवर हा मृतदेह ३ जुलैपासून बेपत्ता असलेल्या रुग्णाचा असल्याचा आरोप भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे. मृतदेहाच्या बॅग पारदर्शक नसल्याने चेहराही पाहण्याची सोय नाही. त्यामुळे नातेवाईकांच्या भावनांशी खेळ केला जात असल्याचे ट्वीट डावखरे यांनी केले. आमदार संजय केळकर यांनीही याबाबत तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. बेपत्ता रुग्णाच्या कुटुंबीयांना दोन दिवसांपासून प्रचंड मनस्ताप होत असून प्रशासनाचा हा निष्काळजीपणा आणि चूक दडपण्याचा प्रकार धक्कादायक असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ही अक्षम्य चूक असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजप आणि कुटुंबीयांकडून होत आहे. पण, कारवाई होत नसल्याने आज राज्यपाल कोशारी यांची भेट घेत त्यांना हा प्रकार भाजप नेत्यांनी व कुटुंबीयांनी लक्षात आणून दिला. त्यावर खंत व्यक्त करत कारवाईचे अश्वासन राज्यपालांनी दिले.