मुंबई -मुंबईत मार्च २०२० पासून कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी साथरोग नियंत्रण कायदा १८९७ अंतर्गत ४ हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. या खर्चाचे ऑडिट ( Cag Audit In Corona Pandemic ) करता येवू शकत नाही, अशी नोटीस महापालिकेने ( Mumbai Municipal Corporation ) कॅगला पाठवली आहे. मात्र राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने ऑडिट करा पण पुढील कारवाई करू नका, असा अभिप्राय राज्य सरकारला दिला आहे. यावर या ऑडिटमधून नागरिकांच्या पैशांची लूट कोणी केली, हे समोर येईल अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा ( Vinod Mishra Criticize To Thackeray Faction ) यांनी दिली आहे.
महापालिकेच्या कामाचे कॅग ऑडिटकोरोना काळात झालेला खर्च, रस्ते कामात घोटाळा, पुलांच्या कामात घोटाळा, दहिसर येथे अजमेरा बिल्डरच्या भूखंडाची खरेदी, सहा सांडपाणी प्रकल्पांवर खर्च, सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू यांच्या वडिलांच्या कंपनीला दिलेले कंत्राट, हायवे कंपनीला ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी दिलेले काम, अशा एकूण १२ हजार कोटींच्या कामांची चौकशी करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅगला दिली होती. त्यानंतर २२ नोव्हेंबरपासून कॅग ऑडिट ( BMC Cag Audit In Corona ) सुरु झाले आहे. कॅगचे ऑडिट सुरु असताना कोरोनाकाळ ही आपत्कालीन परिस्थिती होती आणि साथरोग नियंत्रण कायदा १८९७ अंतर्गत ऑडिट होऊ शकत नाही, असे महापालिका आयुक्त व प्रशासकीय अधिकारी डॉ इकबाल सिंग चहल यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार साथरोग नियंत्रण कायद्याअंतर्गत कॅगला नोटीस देण्यात आली आहे. यावर राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने कोरोना काळातील ऑडिट करा पण त्यावरील पुढील कारवाई करू नका असे म्हटले आहे. महापालिका निवडणूक किंवा राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महापालिकेचे ऑडिट पूर्ण केले जाणार आहे.