मुंबई -केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी विधेयकांवरून लोकसभा व राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेवर भाजपाने जोरदार टीका केली आहे. गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळागोंधळ, अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे, असा टोला भाजपा नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने कृषिविषयक तीन विधेयके लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करून घेतली. या विधेयकावरुन राज्यसभेत प्रचंड गोंधळ झाला. पण ही विधेयके मंजूर करून घेण्यात केंद्र सरकारने यश मिळवले. राज्यसभेत आवाजी मतदानाने ही विधेयके मंजूर करण्यात आली. महत्वाचे म्हणजे, शिवसेनेने लोकसभेत या विधेयकांना पाठिंबा दिला होता. तर, राज्यसभेत शिवसेनेच्या नेत्यांनी विरोधात भाषण करून सभात्याग केला. शिवसेनेच्या या परस्परविरोधी भूमिकेवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे.
या विषयावरून आशिष शेलार यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, शिवसेनेने लोकसभेमध्ये सीएएचे समर्थन केले. त्यानंतर त्यांनी यू-टर्न घेत राज्यसभेमध्ये या विधेयकाला विरोध केला. आता कृषी विधेयकालाही शिवसेनेने लोकसभेत पाठिंबा दिला आणि राज्यसभेत मात्र विरोधात भाषण करून सभात्याग केला. शिवसेनेची महानगरपालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत 'सेम टू शेम' परिस्थिती आहे. शिवसेनेचा गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळागोंधळ, अशी अवस्था झाली आहे.
आशिष शेलार यांनी केलेले ट्विट... भाजपा नेते आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेमुळे पुन्हा शिवसेना व भाजपा यांच्यात राजकीय सामना रंगण्याची शक्यता आहे. शेलारांनी टीका करत शिवसेनेला घेतलेल्या चिमट्याला शिवसेना नेते काय प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल.
हेही वाचा -आरक्षणाला साथ न देणाऱ्या मराठा आमदार-खासदारांना घरी बसवू; मराठा आंदोलकांचा इशारा
हेही वाचा -भिवंडीत इमारत कोसळली.. राज्यात यापूर्वी 'या' ठिकाणी घडल्या दुर्घटना