मुंबई : भाजप नेते राम कदम यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे. भाजप प्रवक्ते आमदार राम कदम म्हणाले आहेत की, शरद पवार सारखे नेते या गोष्टीला स्वीकारतात की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्याग, समर्पण, देशासाठी केलेले महान कार्य आपण नाकारू शकत नाही. शरद पवारांचे हे वक्तव्य म्हणजे राहुल गांधी यांच्या तोंडावर मारलेली एक चपराक आहे. एक तर राहुल गांधी यांचा अभ्यास कमी आहे किंवा अभ्यास असून सुद्धा ते नासमंजस आहेत. अथवा राहुल गांधी जाणीवपूर्वक एका समाजाच्या व धर्माच्या तुष्टीकरणासाठी अशा प्रकारच्या गोष्टी करत आहेत. राम कदम पुढे म्हणाले आहेत की, राहुल गांधी तुम्ही कान उघडे ठेवून ऐका. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी जो संघर्ष व यातना त्यांनी सहन केल्या आहेत, त्या तुम्ही एक दिवस नाही, तर एक तासभरही सहन करू शकत नाहीत, असेही राम कदम यांनी म्हटले आहे.
सावरकरांकडे सामाजिक व वैज्ञानिक दृष्टिकोन :शनिवारी शरद पवार यांनी नागपूर येथे बोलताना सावरकरांवर स्तुती सुमनांचा वर्षाव केला होता. सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांना फार आवडतो असे सांगत, सावरकरांनी अनेक गोष्टी उघडपणे केल्या. त्यांच्याकडे सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन होता, असेही शरद पवार म्हणाले आहेत. सामाजिक दृष्टिकोनातून सावरकरांनी रत्नागिरीमध्ये घर बांधले. त्या घरासमोर छोटसे मंदिर सुद्धा बांधले होते. त्यांनी वाल्मिकी समाजाच्या माणसाला मंदिरात पूजा करण्यासाठी बोलावलं ही एक प्रगतिशील गोष्ट असल्याचेही शरद पवारांनी म्हटले आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी केलेल्या बलिदानाकडे आपणाला दुर्लक्ष करता येणार नाही, असेही शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवारांच्या भाषणाचा हाच धागा पकडून भाजप नेते राम कदम यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.