मुंबई- कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला असल्याने कर्मचार्यांचे वेतन देण्यासाठी राज्य सरकारवर कर्ज घेण्याची वेळ आली आहे. मात्र शिक्षणमंत्री, क्रीडा मंत्र्यांच्या गाड्या खरेदीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल 1 कोटी 37 लाख रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे 'मंत्र्यांना गाड्या घ्यायला पैसे आहेत; कोरोना पॅकेज द्यायला पैसे नाहीत, वा रे वा.. सरकार..!' अशा शब्दात भाजप नेते राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
'वा रे वा..! मंत्र्यांना गाड्या घ्यायला पैसे आहेत, अन् कोरोनाच्या पॅकेजसाठी नाहीत'
करोडो रुपयांचा गाड्या घ्यायला सरकारकडे पैसे आहेत. मात्र, कोरोना संकटात योद्ध्याचे कामकरणाऱ्या पोलीस तसेच सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कापले जात आहेत, ते पगार द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत. मग हे मंत्र्यांचा गाड्या कसे घेत आहेत? असा सवाल कदम यांनी सरकारला केला आहे
इनोव्हा क्रिस्टा 2.4 झेडएक्स (7 एसटीआर) ही गाडी खरेदी करण्यासाठी तब्बल 22 लाख 83 हजार रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. सहा इनोव्हा क्रिस्टा खरेदी करण्यास वित्त विभागाकडून मंजुरी मिळाल्याने तब्बल 1 कोटी 37 लाख रुपये गाडी खरेदीसाठी मंजूर करण्यात आले आहेत. जनतेचे सेवक असल्याचा दावा करत सत्ता स्थापन करणार्या उद्धव ठाकरे यांच्याकडून मंत्र्यांवर केलेली उधळपट्टीबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे
त्यातच राम कदम यांनी महाराष्ट्र सरकारचा या उधळपट्टीबद्दल सरकारला चिमटा काढत, आधी वेतन कापलेल्या कर्मचाऱ्यांना पैसे द्या, तसेच कोरोना पॅकेज जाहीर करा, मग मंत्र्यांचा गाड्यांची चिंता करावी, असे म्हटले आहे.