मुंबई- कोविड रुग्णालयांना भेटी देणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांच्या दौरे-बैठकांना राज्य सरकारने ब्रेक लावला आहे. या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी एक परिपत्रक जारी केले आहे. यानुसार विधानसभा, विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यांना बैठका बोलावण्याचा अधिकार नाही. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी बोलावलेल्या बैठकांना, दौऱ्यांना सरकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये, असा आदेशच या परिपत्राकातून देण्यात आला आहे. यावरून भाजप नेत्यांनी सरकारचे अपयश लपवण्यासाठी, विरोधी पक्षनेत्यांचा बैठकांना अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये, अशा सूचना काढला असल्याची टीका महाविकास आघाडीवर केली आहे.
सरकारच्या या आदेशावर प्रतिक्रिया देताना प्रविण दरेकर म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विभागाच्या मंत्र्यांनी बैठका घेणे अपेक्षित असताना कोविडच्या भीतीने मंत्र्यांनी ते केले नाही. मात्र, आम्ही विरोधी पक्ष नेत्याच्या नात्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही अनेक ठिकाणी भेटी दिल्या, तेथील व्यवस्था गतीमान केली. मुळात हे काम सरकारचे आहे. या उलट ते काम कमी करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आम्ही कोणत्या अधिकाऱ्याला सूचना किंवा आदेश दिले नाहीत. आम्हाला मिळालेली माहिती, व उपयोजनांची गरज याबाबतची माहिती सरकारला कळवा हे आम्ही सुचवत होतो. मात्र, सरकार अशा प्रकारचे आदेश काढून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.