मुंबई- कोरोनाच्या संकटकाळात महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप करत भाजपच्यावतीने आज (शुक्रवार) राज्यभर 'मेरा आंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव' हे आंदोलन करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी त्यांच्या दहिसर पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्गावर असलेल्या संपर्क कार्यालयाबाहेर हे आंदोलन केले.
दरेकर यांच्यासह या आंदोलनात काही भाजप पदाधिकारी काळ्या फिती, काळे मास्क व फलक घेऊन जमले होते. यावेळी महाआघाडी सरकार जागे व्हा, भोंगळ कारभार बंद करा या सारख्या घोषणा देण्यात आल्या. लॉकडाऊन असल्याकारणाने कार्यकर्ते आणि समर्थकांनी आपापल्या घराच्या आवारात तर विरोधी पक्षनेते दरेकर यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर नियमांचे पालन करून आंदोलन केले.
राज्य सरकार परिस्थिती हाताळण्यात सपशेल अपयशी ठरलेले आहे. त्यांनी केंद्रासारखे राज्याला कोरोना विशेष पॅकेज जाहीर करावे. तसेच राज्याचा हिताचे धोरण आखत योग्य पावले उचलावी. आम्ही विरोधी पक्ष त्यांना सहकार्य करत आहोत. पण ते आमची साथ घेऊ इच्छित नाहीत. पण आम्ही गप्प बसणार नाही, असे दरेकर यांनी या आंदोलनाप्रसंगी सांगितले.