मुंबई -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेनचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत आज (शनिवार) प्रसिद्ध झाली. त्यात पवार यांनी म्हटलं आहे की, शिवसेना भाजपसोबत निवडणुकीत नसती तर भाजपला 40 पण सीट मिळू शकल्या नसत्या. यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पवारांच्या 'त्या' वक्तव्यात काहीही तथ्य नाही - प्रवीण दरेकर - शरद पवारांची सामनाला मुलाखत
शिवसेना भाजपसोबत निवडणुकीत नसती तर भाजपला 40 पण जागा मिळू शकल्या नसत्या, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पवारांच्या वक्तव्यावर दरेकर म्हणाले की, आम्ही असे म्हणावे का, जर मोदींची व भाजप लाट नसती तर शिवसेनेचा एकही खासदार आला नसता. तसेच काँग्रेस नसते तर राष्ट्रवादीचे 10 सुद्धा आमदार आले नसते. युतीमध्ये दोन्ही पक्षांची एकमेकांना मदत होत असते. तशी मदत दोन्ही पक्षांनी एकमेकांना केली. पण पवारसाहेब बोलले त्यात काही तथ्य नसल्याचे दरेकर म्हणाले.
संजय राऊत यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली आहे. त्यात पवारांनी उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत ही शिवसेनेच्या कामाची पद्धत असल्याचे म्हटले. तसेच भाजपच्या हातात सत्ता देणं शिवसेनेच्या हिताचं नाही असेही पवार म्हणाले. शिवसेनेचे मुखपत्र दैनिक 'सामना'साठी शरद पवार यांनी मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला. त्यात पवार यांनी लॉकडाऊन, आघाडी सरकारचा कथित रिमोट कंट्रोलपासून ते भाजप, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली आहेत. त्यात पवारांनी भाजप ही शिवसेनेमुळे निवडणुकीत यश मिळवू शकली. शिवसेना सोबत नसती तर भाजपचे 40 ही आमदार येऊ शकले नसते असे त्यांनी म्हटले आहे. त्यावर यात काही तथ्य नाही असं विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले आहे.