मुंबई -शिव प्रसादमध्ये शिवला अभिप्रेत असणारे काम आमच्या पक्षाकडून सुरु आहे, आणि प्रसाद पण आमच्याकडे आहे. शिवभोजनाची थाळी जेव्हा द्यायची तेव्हा द्या... पण आम्ही काय तोंडाला पट्टी लावून बसलो नाही. आम्ही जर भंडाऱ्याची व्यवस्था केली तर तुम्हालाही पंक्तीला बसावे लागेल, असे रोखठोक प्रत्युत्तर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यावर दिले आहे. शिवसेना भवन येथील कालच्या राड्यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता प्रसाद दिलाय, पुढे शिवभोजन थाळी देऊ, असे विधान केले होते, त्याला दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आम्ही मुग गिळून बसणाऱ्यांमधले नाही -
संजय राऊत दोन्ही बाजुने आपले मत मांडत आहेत. एका बाजुने कालचा विषय संपला म्हणायचे आणि दुसऱ्या बाजुने शिवप्रसाद आणि शिवथाळी देण्याच्या गोष्टी करायच्या. शिवसेनेचे हिंदुत्व, देव, दैवत याविषयीची भुमिका पातळ होत आहेत. तुमच्या शिव थाळी पेक्षा आम्ही भंडाऱ्याची व्यवस्था करू म्हणजे थोड पुण्य आमच्या पदरी पडेल. आम्ही मुग गिळुन बसणाऱ्यामधले नाही असा टोलाही प्रविण दरेकर यांनी लगावला.