खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया नाशिक Sanjay Raut On Salim Kutta : सलीम कुत्तासोबत भाजपा पदाधिकारी व्यंकटेश मोरे यांनी पार्टी आयोजित केली होती, असा गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सलीम कुत्ताला पॅरोल कोणी दिला? त्यावेळी गृहमंत्री कोण होतं? याचा तपास करा. त्याला कोणाच्या सहीनं तुरुंगातून बाहेर सोडण्यात आलं? 2016 साली गृह मंत्रालय शिवसेनेकडे नव्हतं, भाजपानं याची चौकशी करून मगच आमच्याकडं बोट दाखवावं, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
सलीम कुत्तासोबतची पार्टी भाजपा पदाधिकाऱ्यानं आयोजित केली होती, भाजपा पदाधिकारी व्यंकटेश मोरेनं कुत्ताला आमंत्रण दिलं होते. - संजय राऊत, खासदार
...म्हणून बडगुजर यांच्यावर कारवाई : व्यंकटेश मोरे हे नाशिकमध्ये भाजपाचे पदाधिकारी आहेत. त्यांनी सर्वपक्षीय पार्टी आयोजित केली असेल, तेव्हा आपल्या परंपरेनुसार बडगुजर गेले असतील. मकाऊ शहरातील कसिनोतील बावनकुळेंचा व्हिडिओ बडगुजर कुटुंबांनी दिला म्हणून बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात आली, अशी माहिती मिळतेय. हे काही कारवाईचं कारण होऊ शकतं का? बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहे, त्यांची शपथ घेऊन सांगतो, त्या व्हिडिओचा बडगुजर यांच्याशी काहीही संबंध नाही. बडगुजर तसंच शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, वरील सर्व आरोप हे खासदार संजय राऊत यांनी केलेले आहेत.
अधिवेशन घेणार : 23 जानेवारी रोजी नाशिकच्या हुतात्मा कान्हेरे मैदानावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं खुलं अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात महाराष्ट्रातील विधानसभा तसंच लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं रणशिंग फुंकायचं आहे. ते श्रीरामाच्या भूमीतून फुंकलं जावं, अशी उद्धव ठाकरेंची भावना आहे. त्यामुळं या लढाईला पंचवटीतून सुरुवात होईल, सत्याचं युद्ध रामाच्या भूमीतून व्हावं, अशी आमची इच्छा असल्याचं राऊत म्हणाले.
हेही वाचा -
- जिल्हा बँक घोटाळा प्रकरण भोवलं, सुनील केदार यांची आमदारकी रद्द
- विकेंड आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळं मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांची गर्दी; 'या' वाहनांना महामार्गावर प्रवेश नाही
- नाशिकच्या मालेगावात अग्नितांडव; 35 हून अधिक घरं आगीत भस्मसात