मुंबई- मला विकास कामांची घाई झाली आहे. औरंगाबादचा विकास वेगाने करायचा आहे. केवळ भूमिपूजन करून कुदळ मारायला आलेलो नाही. काम पूर्ण करायला आलोय, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये म्हणाले. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री म्हणून ते तुमचे कामच आहे, तुम्ही लोकांवर मेहेरबानी करत नाही. औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बाळासाहेबांच्या इच्छेनुसार संभाजीनगर कधी होणार? ते पण सांगून टाका, असे ट्विट राणे यांनी केले आहे.
औरंगाबादच्या चिखलठाणा येथील गरवारे क्रीडा संकुल येथे मनपाच्या औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेचे प्रत्यक्ष भूमिपूजन आणि आभासी पद्धतीने हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन आणि स्मारक भूमिपूजन, जंगल सफारी पार्क भूमिपूजन, शहरातील विविध रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. मी घरात बसतो, अशी माझ्यावर टीका केली जात होती. मात्र, मी घरात बसून काय-काय कामे केलीत, ती आता तुम्हाला दिसतील. घरात बसून केलेल्या कामांचेच भूमीपूजन सोहळे आता करत असल्याचा टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.