मुंबई -एनएसीएलमध्ये मोहित अगरवाल आस्था गृप आणि प्रताप सरनाईक यांच्या गृपने छोट्या गुंतवणुकदारांचे पैसे अडवून तब्बल 250 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. इतकेच नव्हे तर सरनाईक यांनी अनेक घोटाळे केले आहेत. 175 कोटींचा एमएमआरडीए घोटाळा, 250 कोटींचा एनएसीएल घोटाळा हा हजार कोटींपेक्षाही जास्त असू शकतो. म्हणूनच सरनाईक हे ईडीसमोर चौकशीला जात नाही आहेत, असा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सरकार त्यांना वाचवत असल्याची टीकाही त्यांनी केली. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री योगींच्या मुंबई भेटीबाबत
गेल्या अनेक वर्षात विविध राज्यातील मुख्यमंत्री मुंबईत आले. त्यांनी उद्योगपतींसोबत चर्चा केली. असे कसे कोणी मुंबईतून बॉलिवूडला घेऊन जाईल, असा सवालही त्यांनी केला. मात्र, ठाकरे सरकार हे घाबरणारे सरकार आहे. मुंबईत येऊन लोक प्रेरणा घेऊन जातात, याचा आनंद व्हायला हवा. मुंबई नेहमी प्रगती करत पुढे जाणार आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मुंबई दौऱ्यादरम्यान, बॉलिवूड अभिनेते अक्षय कुमार आणि उद्योगपतींची भेट घेतली. यावरुन ते बॉलिवूड उत्तरप्रदेशात घेऊन जात असल्याचा आरोप करण्यात आला होता.