मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबाशी जमीन व्यवहार केल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी अन्वय नाईक यांची जमीन रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी खरेदी केल्याचा पुरावा म्हणून सातबाराची प्रत ट्विटरवर शेअर केली आहे. नाईक व ठाकरे कुटुंबीयांच्या आर्थिक संबंधामुळे अर्णबला टार्गेट केले जात आहे, असा आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाचा अन्वय नाईक कुटुंबाशी जमीन व्यवहार; सातबारा केला शेअर - ठाकरे कुटुंबाचा अन्वय नाईक कुटुंबाशी जमीन व्यवहार
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी अन्वय नाईक यांची जमीन रश्मी ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी खरेदी केल्याचा पुरावा म्हणून सातबाराची प्रत ट्विटरवर शेअर केली आहे. नाईक व ठाकरे कुटुंबीयांच्या आर्थिक संबंधामुळे अर्णबला टार्गेट केले जात आहे, असा आरोप किरीट सोमैय्या यांनी केला आहे.
सध्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी हे न्यायालयीन कोठडीत असताना आता ठाकरे कुटुंबाचा अन्वय नाईकशी संबंध असल्याचा आरोप सोमैय्या यांच्याकडून करण्यात आला आहे. याप्रकरणावरून नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अन्वय नाईक कुटुंबीयांचे व रश्मी ठाकरे यांचे जागेबाबत तसेच आर्थिक व्यवहार होते, ते का लपवले गेले? उद्धव ठाकरे व मनीषा वायकर यांनी नाईक कुटुंबीयांकडून जमिनी घेतल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे अर्णब गोस्वामी यांना टार्गेट करत आहेत का? असे प्रश्न सोमैय्या यांनी विचारले आहेत.