मुंबई :वांद्रे पूर्वेकडील म्हाडा वसाहतीत असलेले शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय तोडण्यात आले. म्हाडाने कार्यालय अधिकृत करण्यास नकार दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी स्वतः कार्यालय तोडले. भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी यानंतर तोडलेल्या कार्यालयाच्या पाहणीसाठी वांद्रेला येणार असल्याचा इशारा दिला होता. परब यांनी पत्रकार परिषद घेत, कार्यालयीन जागेबाबत दुरांव्येय संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, कथित आरोप करणाऱ्या सोमय्यांनी या ठिकाणी येऊन दाखवावे. शिवसैनिक त्यांचा योग्य तो पाहुणचार करतील, असे थेट आव्हान दिले होते. किरीट सोमय्या यांनी आपली बदनामी केली. म्हाडाला नोटीस प्रकरणी जाब विचारणार आहे. तसेच, मला नोटीस पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली. यासाठी आपण मुंबई हायकोर्टात जाणार असल्याचेही परब यांनी सांगितले होते.
सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी : पत्रकार परिषद संपताच परब यांनी म्हाडाकडे मोर्चा वळवला. त्यांच्यासह शेकडो शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिक म्हाडा प्राधिकरणाच्या कार्यालयात धडकले. पोलिसांनी शिवसैनिकांना अडवण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये यावेळी बाचाबाची झाली. मात्र, आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. त्यामुळे वातावरण काही काळ तंग झाले होते.