महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

होऊन जाऊ दे एकदा...! शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर भाजप नेते आक्रमक - शिवसेना विरुद्ध भाजप

उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या भाषणावरून भाजप नेते राम कदम, किरीट सौमय्या, केशव उपाध्ये, निलेश आणि नितेश राणे, अतुल भातखळकर यासह वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौत यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे, त्याबाबतचा हा वृत्तांत...

BJP on Uddhav
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर भाजप नेते आक्रमक

By

Published : Oct 26, 2020, 11:05 AM IST

मुंबई- विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षी होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा रविवारी मुंबईतील सावरकर सभागृहात पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तोंडाचा मास्क काढून विरोधकासह मुंबई विरोधात गरळ ओकणाऱ्यांचा ठाकरी शैलीत समाचार घेतला. यामध्ये जीएसटी, सुशांत आत्महत्या, कंगना रणौत, राणे कुटुंब, मुंबईची बदनामी करणाऱ्यासह अनेकांना उद्धव यांनी निशाण्यावर घेतले होते. उद्धव ठाकरे यांच्या या भाषणावर भाजप नेते आक्रमक झाले असून त्यांनीही प्रत्युत्तरादाखल ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

केंद्र आणि भाजपवर टीका कऱण्यावरच ठाकरेंचा भर- केशव उपाध्ये

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किमान शिवसैनिकासमोर बोलताना तरी त्यांच्या सरकारने गेल्या वर्षभरात केलेल्या ठोस कामांची यादी देतील, असे वाटले होते, मात्र त्यांच्या भाषणाचा सर्व वेळ हा केंद्र सरकार वर आणि भाजपा वर टीका करण्यात घालवला. मुळात सरकारचे सांगण्यासारखे काम सांगण्यासारखेच नसावे. पुढच्या महिन्यात काम सांगणार अस सांगून सर्व भाषणाचा वेळ शिवसैनिकांना भावनिक साद घालण्यापलीकडे आजच्या भाषणात काहीच नव्हत. औरंगजेब, वाघ, कोथला, महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडणार नाही या भाषेपलीकडे काहीच नव्हते.

सरकारमध्ये मुख्यमंत्री कोणती कामे केली आहेत ती मी महिनाभरात सांगणार असल्याचे उद्धव ठाकरे कालच्या मेळाव्यात म्हणाले होते. त्यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे.

अनेक वर्षे हिंदुत्वाशी तडजोड नाही अशी भाषा करणारे उध्दव ठाकरे हे सत्तेसाठी हिंदुत्वापासून दूर गेले. महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टीने ग्रासलाय, शेतकऱ्यांची व्यथा भाषणात सांगितले पण त्याच शेतकऱ्यांना अवघे १० हजार रूपये देऊन चेष्टाच केली आहे, असल्याच्या टीकाही त्यांनी ठाकरेवर केल्या आहेत.

होऊन जाऊ दे एकदा;तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही - निलेश राणे

बेडूक आणि त्याचे दोन पिल्ले आणि त्याच्या बेडूक उड्या, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही मुलांचे नाव न घेता केली होती. त्यावर नारायण राणेच्या निलेश आणि नितेश या दोन्ही राजकारण्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल १ वाक्य पण बिहारवर २० मिनिट. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा... तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरत नसल्याचे आव्हान माजी खासदार निलेश राणे यांनी दिले आहे.

फक्त योग्य वेळ येऊन दया.. -नितेश राणे

बिहार च्या अगोदरच पक्षप्रमुखांनी “लस” घेतलेली दिसते.. जास्तच हवा भरलेली आज.. किती आव आणत आहेत. मात्र, 'टाचणी’ तयार आहे..फक्त योग्य वेळ येऊन द्या, असे म्हणत नितेश राणेंनी ठाकरेच्या भाषणावर टीका केली. तसेच ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे राणे यांच्या मुलांना बेडकांची पिल्ले संबोधले होते. त्याबर बोलतना; ' दुसऱ्यांची 'पिल्ल' वाईट..मग यांनी काय त्या DINO च्या खुशित नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा "श्रावणबाळ" जन्माला घातला आहे का? इतकी खुम खुमी आहे ना मग त्या दिशा सैलान केस प्रकरणात मुंबई पोलिसांवरवर कुठला ही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करु दया.. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते! अशी टीका केली आहे.

काँग्रेस नेते सावरकरांचा अपमान करतात तेव्हा शिवसेना गप्प का? - राम कदम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचे पाठ स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहातून देशाला सांगितले. मात्र, आमचा प्रश्न एकच आहे, काँग्रेस नेते सावरकरांसंदर्भात अपमानकारक भाषा बोलत होते त्यावेळी शिवसेना गप्प का होती?”, असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात झालेल्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरले होते. त्यानंतर आता भाजप नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत विचारला आहे.

किरीट सोमय्या-

त्याशिवाय, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन त्यांच्यावर पलटवार केला. “ज्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी राम मंदिर विरोधकांसमोर गुडघे टेकले; त्यांनी हिंदू मंदिरं, घंटा, हिंदू धर्म, हिंदू पूजा पद्धती, आरतीची चेष्टा करू नये”, असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.

खरच पाडा हो सरकार - अवधूत वाघ

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपर चौफेर टीका केली. मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक जण सरकार पाडण्याच्या मागे आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केला. तसेच हिम्मत असेल तर हे सरकार पाडून दाखवा असं आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले होते, त्याच्या या वक्तव्यावर भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी देखील खोचक टोमणा लगावला आहे.

हिम्मत असेल तर सरकार पाडुन दाखवा..असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणत आहेत. याचा खरा अर्थ..खरच पाडा हो. सहन ही होत नाही आणि सांगता ही येत नाही, असा आहे अशी टीका त्यांनी ठाकरेवर केले आहे. तसेच कालचा दसरा मेळावा नाही तर हसरा मेळावा असल्याचाही टोला लगावला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुबड्यांवर उभे असलेले हिंदुत्व डळमळीतच -भातखळकर

शिवसेनेचा कालचा मेळाव दसरा नसून हसरा मेळावा असल्याचे म्हणत भाजप आमदार भातखळकर यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धवजी, संघवाल्यांच्या काळ्या टोपी खाली मेंदू असतोच, परंतु तो मेंदू सत्ता मिळावी म्हणून टोप्या फिरवणारा नसतो, अशी बोचरी टीकाही भातखळकर यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी कोश्यारी यांना माझ्या हिंदूत्वाचे प्रमाणपत्र देण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. तोच धागा पकडून भातखळकर यांनी हिंदूत्वाचे प्रमाणपत्राची गरज नसलेल्यांना पुन्हा पुन्हा का सांगावं का लागतं की, आमचं हिंदुत्व असं आणि आमचं हिंदुत्व तसं??? असा सवाल करत भातखळकरांनी उद्धव ठाकरेंच्या हिंदूत्वावर ही निशाणा साधला आहे.

तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुबड्यांवर उभे असलेले हिंदुत्व डळमळीत, मिळमिळीत आणि गर्भगळीत असणारच असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीकरून सत्ता स्थापन केल्याने शिवसेनेवर लगावला.

ABOUT THE AUTHOR

...view details