मुंबई - कोरोनाने निर्माण केलेले महाभयंकर संकट अद्यापही टळलेले नसताना शाळा कधी सुरू होणार यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
आमदार आशिष शेलार यांचा सरकारला टोला परीक्षांपेक्षा शिक्षण महत्त्वाचे, पण शाळा कशा व कधी सुरू होणार? माहीत नाही. मुख्यमंत्री जाहीर करतात, अंतिम वर्षे पदवी परीक्षा रद्द. पण, अद्याप लेखी आदेश नाही. त्यामुळे विद्यापीठांत परीक्षांची तयारी सुरू. शिक्षणाचा महाराष्ट्रात असा "गोंधळात गोंधळ" आहे, अशा शब्दात भाजपा नेते आणि माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री परीक्षा रद्द केल्याचे जाहीर करतात. तर वैद्यकीय शिक्षणमंत्री परीक्षा घ्या, म्हणून राज्यपालांना जाऊन भेटतात. तर बार कौन्सिल ऑफ इंडिया म्हणते, परीक्षा घ्यावीच लागेल. कुलपती म्हणून राज्यपालांना काहीच अवगत केले जात नाही, असे शेलार यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
पदवी अंतिम वर्षाला सरासरीवर गुण देऊन तब्बल 40% म्हणजे एटीकेटी असलेल्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थी नापास करण्याचे हे षडयंत्र? तरुणांची एक पिढी उद्ध्वस्त करण्याचे हे षडयंत्र? उच्च शिक्षणमंत्री म्हणतात, योग्य वेळी निर्णय घेऊ? सरकारमध्ये कोण काय बोलत आहे कळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे, असे देखील आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
कोरोनामुळे विद्यार्थी भयभीत झाले आहेत. पालकांची नोकरी किंवा धंदा धोक्यात आहे. त्यात शिक्षणाचा "गोंधळात गोंधळ" असल्याने दुर्दैवाने विद्यार्थी तणावात आहेत. आता तरुणांचे भविष्य वाचवण्यासाठी "सरकारचे संकटमोचन" खा.संजय राऊत तुम्हीच धावून या! चला तरुणांचे भविष्य वाचवू या! अन्यथा संघर्ष करावाच लागेल, असे म्हणत शेलारानी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.