मुंबई -केंद्रीय यंत्रणांच्या नावाने वसूलीचे षडयंत्र राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत रचले जात तर नाही ना?, अशी शंका सौरभ त्रिपाठी ( Saurabh Tripathi Case ) यांचे प्रकरण उघड झाल्यामुळे उपस्थित होते आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते, आमदार ॲड. आशिष शेलार ( Bjp Leader Ashish Shelar ) यांनी केली असता गृहमंत्र्यांनी ती मान्य करीत चौकशीची घोषणा केली. याबाबतची माहिती आशिष शेलार यांनी विधान भवन ( Ashish Shelar in Vidhanbhavan ) परिसरामध्ये प्रसारमाध्यमांना दिली.
त्रिपाठीसारखे अन्य कोणी अधिकारी वसूली तर करीत नाही ना? -
राज्याच्या पोलीस दलातील सौरभ त्रिपाठी हे आयपीएस अधिकारी आंगडीया या व्यापाऱ्याकडून आयकर अधिकारी असल्याचे भासवून वसूली करीत असल्याचे उघड झाल्यानंतर राज्य शासनाने सौरभ त्रिपाठी यांना निलंबित केले. या प्रकरणानंतर राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अशा प्रकारे केंद्रीय यंत्रणांच्या नावाचा वापर करुन वसूली तर करीत नाही ना? केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचे षडयंत्र तर राज्यातील प्रशासकीय यंत्रणेमध्ये शिजत तर नाही ना? त्रिपाठीसारखे अन्य कोणी अधिकारी वसूली तर करीत नाही ना? त्यांच्या पाठीशी कोण उभे आहे की काय? असे प्रश्न आता उपस्थित होत असून असे असेल तर महाराष्ट्राची आणि देशाची बदनामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गंभीर बाब असून याप्रकरणी तातडीने शासनाने दखल देऊन आवश्यकता असल्यास चौकशी करावी, अशी मागणी आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याची शासन दखल घेत असून चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली.