महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्धव ठाकरेंच्या हाताला रामभक्त, कारसेवकांच्या खुनाचं रक्त; 'हे' उदाहरण देत आशिष शेलारांची टीका - उद्धव ठाकरे

Ashish Shelar On Uddhav Thackeray : राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. राम मंदिरावरुन सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे.

Ashish Shelar Slams Uddhav Thackeray
आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 7:52 PM IST

मुंबई Ashish Shelar On Uddhav Thackeray : राम मंदिराच्या मुद्द्यावरून आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ज्या राम मंदिरासाठी कोठारी बंधूंनी स्वतःचं बलिदान दिलं, त्यांचा खून मुलायम सिंह यांच्या समाजवादी पक्षानं केला. ज्या रामभक्त, कारसेवक कोठारी बंधूंच्या खुनाच्या रक्तानं समाजवादी पक्षाचे हात रंगले आहेत, त्यांच्याबरोबर हात मिळवणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या हाताला रामभक्तांच्या, कारसेवकांच्या खुनाचे रक्त लागले आहे, असं म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

संघटनेच्या तळागाळातील स्तरावर पोहोचणे : याप्रसंगी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय कार्यक्रम चालू आहे. ३ लोकसभा मतदारसंघासाठी एक नेता याप्रमाणे देशभर प्रवासाचा कार्यक्रम ठरला असून, ज्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सर्वजण देशातील तीन ते चार लोकसभेचे एक क्लस्टर बनवून देशभर बैठका घेणार आहेत. राज्यातील निवडणुकींच्या तयारीवर बोलताना शेलारांनी सांगितलं की, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे प्रत्येक लोकसभेच्या तीन विधानसभा यांच्या बैठका घेणार आहेत. त्याचा दौरा सुरू झालाय. जे प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील प्रत्यक्ष निवडणुकीचं काम पाहणार आहेत. अशा सुपर वॉरिअरची मुंबईत बैठक घेतली जाणार आहे. त्यामागील उद्दिष्ट हे संघटनेच्या तळागाळातील स्तरावर पोहोचणे हे आहे, याच अनुषंगाने देशात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे.

पक्ष आहे की, तो गट आहे : शरद पवार गटाच्या बैठकीबाबत पत्रकारांनी विचारलं असता शेलार म्हणाले, शरद पवार यांच्या पक्षात किती आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आहेत हे त्यांनी अगोदर स्पष्ट करावे. तसेच त्यांचा पक्ष आहे की, तो गट आहे. आताच्या घडीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना त्यांचा पक्ष हा एक गट आहे, या सत्यावर त्यांना आता यावं लागेल.

मदतीकरिता देशभर सरपटत आहे : ठाकरेंच्या दिल्लीतील दौऱ्याबाबत बोलताना शेलार म्हणाले, उद्धव ठाकरे भाजपासोबत होते, त्यादरम्यान आमच्याकडे या, बंगल्यावर या अशा पद्धतीचा त्यांचा अहंकार होता. पण आता सरपटत ते दिल्लीला जात आहेत. त्यांना बेशक सरपटत दिल्लीला जाऊ दे, पण महाराष्ट्र हे सर्व बघतो आहे. शेलार पुढे म्हणतात की, उद्धव ठाकरेंचा शिवसेना गट स्वतःच्या जागा जिंकून आणण्यासाठी मदतीकरिता देशभर सरपटत आहे. ज्या वेळेला ते आमच्याबरोबर होते त्यावेळी ठाकरे कुटुंबाचा मान आणि स्वाभिमान हा भारतीय जनता पक्षाने नेहमी टिकवला होता. स्वार्थासाठी तसेच स्वतःच्या मुख्यमंत्रीपदासाठी, खुर्चीसाठी, लालचीपणा केवढा असतो हे उद्धव ठाकरे यांनी आज दाखवून दिलाय.

हेही वाचा -

  1. देवेंद्र फडणवीसांच्या वजनानं बाबरी पडली असावी; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
  2. 'समस्या जाणून घेण्यासाठी फिल्डवर उतरावं लागतं', नाव नं घेता मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला
  3. उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर जोरदार टीका; म्हणाले 'उंबरठ्यावर आलेली हुकूमशाही रोखा'

ABOUT THE AUTHOR

...view details