मुंबई :महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज सायंकाळी मुंबईतील बीकेसी मैदानात होत आहे. याप्रसंगी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, जे मैदान ग्राहकोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाला ही कमी पडते. अशा मैदानाची निवड महाविकास आघाडीने वज्रमूठ सभेसाठी केली आहे. एकट्या भाजपाची सभा असते, तेव्हा व्यवस्थेला जे मैदान वापरावे लागते अशा बीकेसीतील सर्वात छोट्यातील छोट्या मैदानाची निवड महाविकास आघाडीने वज्रमूठ सभेसाठी केली आहे. हीच त्यांची वज्रमूठ का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच या सभेसाठी मैदान छोटे, आकडे खोटे आणि राऊतांसारखे भोंगे फक्त मोठे, असे सांगत त्यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधला आहे.
भविष्यात नरे पार्कातच सभा :आशिष शेलार पुढे म्हणाले की, एरवी सभेसाठी शिवाजी पार्क मैदानाचा अट्टहास करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने सभेसाठी शिवाजी पार्क सोडले. बीकेसी मधील मोठी मैदाने घेणे सुद्धा त्यांनी टाळले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हा प्रवास ईश्वरनिष्ठांकडून कम्युनिष्ठांकडे होत आहे. त्यामुळे भविष्यात महाविकास आघाडीला नरे पार्कातच सभा घ्याव्या लागतील, असे वाटतेय! असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे.