मुंबई - सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात मृतदेहाच्या बाजूला रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबई महापालिकेच्या, सरकारच्या संवेदना मृत झाल्या आहेत? जगासमोर हाच तुमचा सायन पॅटर्न नेणार का? मुख्यमंत्री, पालकमंत्री गरिबांची एवढी क्रूर चेष्टा का करताय? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी विचारला आहे.
'हाच का तुमचा गरिबांना मारण्याचा, त्यांची क्रूर चेष्टा करण्याचा, हाच का तो तुमचा सायन पॅटर्न?' - मृतदेहांच्या बाजूला उपचार सायन रुग्णालय
आमदार नितेश राणे यांनी ट्वीट केलेल्या एक व्हिडिओमध्ये मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात मृतदेहाच्या बाजूला रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे दिसत आहे. त्यावरून आमदार राणेंसोबतच इतर भाजप नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
!['हाच का तुमचा गरिबांना मारण्याचा, त्यांची क्रूर चेष्टा करण्याचा, हाच का तो तुमचा सायन पॅटर्न?' sion hospital issue BJP leader ashish shelar भाजप नेते आशिष शेलार महाविकास आघाडी सरकार सायन रुग्णालय प्रकार मृतदेहांच्या बाजूला उपचार सायन रुग्णालय आमदार नितेश राणे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7098407-431-7098407-1588844028232.jpg)
आयीसीएमरच्या गाईडलाईन सरकारने काळे फासले आहे. केंद्रीय पथकाने मुंबई येऊन जी भीती व्यक्त केली होती त्यावरून राजकारण केले. शेवटी महापालिकेचे पितळ उघडे पडलेच नाही. थांबवा तुमचे राजाकरण, गरिबांचा जीव घेऊ नका आणि गरिबांना कोरोनाच्या जबड्यात घालायचे पाप करू नका, असे देखील शेलार म्हणाले.
नेमका काय आहे प्रकार -
कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून येत आहेत. या रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात कोरोना विषाणूने मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहाबाजूलाच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा प्रकार आमदार नितेश राणे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत उघडकीस आणला आहे. हा प्रकार लाजिरवाणा असल्याची टीका राणे यांनी केली आहे. या व्हिडिओमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह वॉर्डमध्ये खाटांवर आणि स्ट्रेचरवर प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेले दिसत आहेत, तर त्याच्या बाजूलाच इतर रुग्ण उपचारासाठी दाखल असलेले दिसत आहे. हा प्रकार लाजिरवाणा असून रुग्णालय प्रशासन काय करते, असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुंबई महापालिकेवर देखील शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे आता भाजप नेते सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करत आहेत.