मुंबई-आपल्या राजकीय स्वार्थासाठी राज्य सरकारने अंतिम वर्ष परीक्षांचा "घोळ घालून दाखवला" आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आरोग्य धोक्यात आणले. उलट विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी युजीसीनेच केली. सरकारने ना युजीसीचे परिपत्रक नीट वाचले, ना कसला अभ्यास केला, ना परिणामांचा विचार केला, अशी टीका भाजपा नेते ॲड.आशिष शेलार यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकार उगाचच आपणच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी करत असल्याचा दावा करते आहे. तो साफ खोटा आहे. राज्य सरकारने केवळ युवराजांचा हट्ट पुरवला, सगळा राज्यात कॉपी पेस्ट कारभार सुरू आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता शेलार यांनी लगावला. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे.
राज्यात पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाला मुंबई विद्यापीठात 4 लाख 85 हजार 536, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात 1 लाख 63 हजार 573, नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात 2 लाख 40 हजार 397, सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात 36 हजार 168, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 2 लाख 18 हजार 06, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 59 हजार 083, जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 49 हजार 994, तर एसएनडीटी विद्यापीठात 46 हजार 231, सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 2 लाख 29 हजार 997, गोडवांना विद्यापीठात 45 हजार, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात 1 लाख 63 हजार 716 विद्यार्थी राज्यातील 11 अकृषी विद्यापीठात प्रथम आणि व्दितीय वर्षे पदवीसाठी परीक्षेस बसणार होते. याची एकूण संख्या 16 लाख 15 हजार 464 विद्यार्थी होते. कोरोनाच्या काळात त्यांच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षक, विद्यार्थी यांच्या "आरोग्याची काळजी" करुन 29 एप्रिलला युजीसीनेच घेतला. राज्य सरकारने नव्हे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार उगाचच आपणच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी करत असल्याचा दावा करते आहे. तो साफ खोटा आहे, असे शेलार यांनी म्हटले आहे.