मुंबई - 'नोकरी व शिक्षणात मराठा समाजाला तत्कालीन मुख्मंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने आरक्षण मिळवून दिले होते. आरक्षण आणि आरक्षणाचे फायदे टिकवण्यात ठाकरे सरकार असमर्थ ठरले आहे. अजूनही महाविकास आघाडी सरकारने हा अहंकाराचा विषय करु नये. हे आरक्षण कायद्याच्या कक्षेत कसे बसेल, असे निर्णय घ्यावेत. यासाठी भाजप राज्य सरकारसोबत असेल', अशी भूमिका भाजप आमदार आशिष शेलार यांनी आज (5 मे) घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली.
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज अंतिम सुनावणी झाली. राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्यानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना राज्यातील ठाकरे सरकारवर सडकून टीका केली.
'आरक्षणाचे फायदे टिकवण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले'
'मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयावर संपूर्ण निकालपत्र वाचल्यावरच प्रतिक्रिया देता येईल. पण, सध्या मिळालेली प्राथमिक माहिती, काही वेबसाईट्स, सोशल मीडिया आणि न्यायालयाचे ट्विटर यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इतकेच सांगू शकतो, की मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मिळवून दिलेले आरक्षण आणि आरक्षणाचे फायदे टिकवण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे', असे आशिष शेलार म्हणाले.