मुंबई - भाजपचे सरकार देशात मुस्लीमविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आज गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा प्रस्ताव लोकसभेत मांडल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आंबेडकर यांनी या विधेयकाला विरोध केला आहे. हा घटनेचा द्रोह असून, अर्थव्यवस्थेसारखे मुद्दे बाजूला पडावे म्हणून हिंदू-मुस्लीम वातावरण तयार करण्याची ही भाजप आणि आरएसएसची खेळी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या देशात जी नऊ रत्ने आहेत ती विकण्यासाठी हे सरकार प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.