मुंबई - राज्यात शिवसेना आणि भाजपाची युती तुटल्यावर मुंबई महानगरपालिकेत भाजपाने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. तसेच विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला होता. मात्र, हे पद भाजपाला देण्यात न आल्याने भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पालिकेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे भाजपाला विरोधी पक्षनेतेपद देण्यात यावे, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. या याचिकेत शिंदे यांनी राज्याचा नगरविकास विभाग, मुंबई महानगरपालिका, आयुक्त आणि महापौर यांना प्रतिवादी बनवण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेत 25 वर्षांहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. याच काळात शिवसेनेचा मित्रपक्ष म्हणून भाजपाने साथ दिली. मात्र, केंद्रात राज्यात भाजपाची सत्ता येताच भाजपाने 2017मधील महापालिकेची निवडणूक शिवसेनेची साथ न घेता लढवली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे 84 आणि भाजपाचे 82 नगरसेवक निवडून आले होते. मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेने दिलेल्या उमेदवाराला भाजपाने पाठिंबा देऊन मतदान केले होते. निवडणूक झाल्यावर भाजपने विरोधी पक्षनेते पदावर दावा न केल्याने पालिकेतील विरोधी पक्षनेतेपद दोन ते तीन महिने रिक्त होते. यामुळे काँग्रेसने या पदावर दावा केला होता. त्यावर तत्कालीन भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी भाजपा कोणतेही पद घेणार नसल्याचे व पहारेकऱ्याची भूमिका पार पाडेल, असे घोषित केले होते. त्यामुळे संख्येने तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले.