मुंबई -शिवसेनेला वंदे मातरमचे वावडे आहे का? महाविकास आघाडीतील काही सहभागी पक्षांना सांभाळण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हिंदुत्वापासून फारकत घेणारी भूमिका घेतली आहे का? असे प्रश्न भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापौरांना विचारले आहेत. येत्या १८ तारखेला सभागृहात वंदे मातरमचा प्रस्ताव मंजूर केला नाही, तर प्रखर आंदोलन करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
काय आहे प्रस्ताव -
वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे समूहगान महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व अनुदानित शाळा आणि पालिकेच्या सर्व वैधानिक समित्यांमध्ये केले जावे, असा ठराव भाजपा नगरसेवक संदीप पटेल यांनी १० ऑगस्ट २०१७ रोजी मांडला होता. या ठरावावर आयुक्तांच्या सकारात्मक अभिप्रायावर अंतिम निर्णय घेण्यासाठी आयुक्तांनी हा प्रस्ताव महापालिकेस जानेवारी २०२० च्या कार्यक्रम पत्रिकेवर सादर केला. परंतु, महापौरांनी हा विषय तहकूब केला. हा तहकूब विषय पुन्हा महानगरपालिकेच्या सप्टेंबर २०२० च्या कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट केला होता. सदर विषयाला भाजपा नगरसेवक संदीप पटेल यांनी २३ ऑक्टोबर २०२०, २२ डिसेंबर २०२०, ५ जानेवारी २०२१ रोजी अग्रक्रम मागितला होता. मात्र, तो देणे महापौरांनी हेतुपुरस्कर टाळले. वंदे मातरम गीत गायनाच्या पत्रिकेवरील विषयाला महापौरांनी एकदा तहकुब आणि तीन वेळा बगल दिली आहे. याआधी तीनवेळा अग्रक्रम मागूनही महापौरांनी त्याकडे दुर्लक्ष करत सभा गुंडाळली आहे.
हिंदुत्वापासून फारकत -
देशाचे जबाबदार नागरिक म्हणून भावी पिढीच्या मनात देशप्रेमाची ज्योत सदैव तेवत राहावी यासाठी, मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळा आणि मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व अनुदानित शाळांमध्ये आठवड्यातून दोनदा वंदे मातरम या राष्ट्रगीताचे समूहगान करण्यात यावे याबाबतची ठरावाची सूचना मांडण्यात आली होती. मात्र, सत्ताधार्यांकडून हा विषय वारंवार तहकूब करण्यात येत आहे. वंदे मातरमला सातत्याने विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीतील काही सहभागी पक्षांना सांभाळण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हिंदुत्वापासून फारकत घेणारी भूमिका घेतली आहे.
आंदोलनाचा इशारा -
याबाबत अभिप्राय देताना आयुक्त यांनी महानगरपालिकेच्या शाळेत वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत दररोज शाळा सुटताना गायले जाते असे म्हटले आहे. मात्र, या अभिप्रायात अनुदानित शाळांमध्ये वंदे मातरम् म्हटले जात असल्याचा स्पष्ट उल्लेख नाही. तसेच महानगरपालिका सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे समूहगान केले जाते. त्याच धर्तीवर महानगरपालिकेच्या सर्व वैधानिक समित्या, प्रभाग आणि विशेष समित्यांचे कामकाज सुरू होण्यापूर्वी वंदे मातरमचे समूहगान घेतले जावे, अशा आशयाची ठरावाची सूचना आहे. त्यावर आयुक्तांनी सकारात्मक अभिप्राय दिलेले आहेत. अंतिम निर्णय महापालिकेस घ्यायचा आहे. याबाबत तातडीने महानगरपालिकेने निर्णय घ्यावा. शिवसेनेने १८ जानेवारीला होणाऱ्या महापालिका सभेत हा विषय चर्चेस आणला नाही तर याबाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रखर आंदोलन केले जाईल असा इशारा भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिला.