मुंबई -बृहन्मुंबई महानगरपालिकेचा बुधवारी (दि. 3 फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मात्र, हा अर्थसंकल्प फसवा आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केली आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाच्या आजी आणि माजी नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत या अर्थसंकल्पाबाबत टीका केली आहे.
आकड्यांची फिरवाफिरव करणारा अर्थसंकल्प
आज मुंबई महानगरपालिकेचा बजेट सादर झाला. पालिकेच्या आयुक्तांनी जी अर्थसंकल्प सादर केला तो फसवा आहे. विकासाची स्वप्ने दाखवणारा अर्थसंकल्प असून विकासासाठी पैसे कोठून आणणार याची माहिती दिलेली नाही. पालिकेचे उत्पन्न घटले आहे. सरकारकडे जवळपास 5 हजार कोटी थकबाकी आहे. ती कशी मिळवायची हे या अर्थसंकल्पात सांगीतलेले नाही किंवा याबाबत स्थायी समितीने काही उपाय योजना केल्या नाहीत. हा अर्थसंकल्प आकड्यांची फिरवाफिरव करणारा अर्थसंकल्प आहे, अशी टीका भाजप गटनेता प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.