मुंबई- लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून ईशान्य मुंबई (उत्तर पूर्व) लोकसभा मतदारसंघ उमेदवारी, युतीमधील संबंध यामुळे सतत चर्चेत राहिला आहे. भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांचा बुधवारी मानखुर्द येथे प्रचार सुरू असताना त्यांच्या प्रचाररथाची अज्ञात व्यक्तींनी नासधूस केली. प्रचार रथाची नासधूस केल्याप्रकरणी भाजपकडून मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मानखुर्द येथे भाजप उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचाररथाची नासधूस, तक्रार दाखल - rally
भाजपचे उमेदवार मनोज कोटक यांचा बुधवारी मानखुर्द येथे प्रचार सुरू असताना त्यांच्या प्रचार रथाची अज्ञात व्यक्तींनी नासधूस केली. प्रचार रथाची नासधूस केल्या प्रकरणी भाजपकडून मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ईशान्य मुंबईमधून भाजपचे खासदार म्हणून किरीट सोमय्या निवडणून आले होते. गेल्या काही वर्षांत शिवसेना आणि भाजप युती तुटल्याने सोमय्या यांनी शिवसेनेवर व उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध केला. सोमय्या यांना उमेदवारी दिल्यास आपण याच मतदारसंघातून निवडणूक लढऊ, असा इशारा शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी दिला होता. यामुळे शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपला उमेदवार बदलून मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली. कोटक यांना उमेदवारी दिल्यानंतरही शिवसेना आणि भाजपामधील म्हणावे तसे संबंध राहिले नसल्याने आजही दोन्ही पक्षामधील दुरावा तसाच राहिल्याचे प्रचारादरम्यान दिसत आहे.
अशा परिस्थितीमध्ये कोटक यांचा प्रचार सुरु आहे. प्रचारफेऱ्या, पदयात्रा, सकाळच्यावेळी उद्यानांमधून लोकसंपर्क यावर कोटक यांनी भर दिला आहे. कोटक यांचा प्रचार मानखुर्द येथे सुरू असताना आज त्यांच्या प्रचार रथाची अज्ञात व्यक्तींनी नासधूस केली आहे. रथावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र धारधार शस्त्राने फाडून टाकण्यात आले आहे. तसेच प्रचाररथाच्या चालकालाही धमकी देण्यात आली, अशी लेखी तक्रार भाजपकडून मानखुर्द पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघात राजकीय वातावरण दूषित करण्याचा तसेच भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.