मुंबई:राज्यातील पाच विधान परिषद निवडणुकीपैकी कोकण शिक्षक मतदारसंघाचा निकाल हाती आला आहे. भाजपने महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत विजयाची पताका फडकावली. या निवडणुकीत भाजप-युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांचा पहिल्याच फेरीत दारुण पराभव केला. म्हात्रे यांना वीस हजारहून अधिक मते मिळाली तर बाळाराम पाटील यांना नऊ हजार मतांवर समाधान मानावे लागले.
जोरदार लढत: राज्यात शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत जुंपली होती. उमेदवारांची पळवापळवी करण्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत सावळा गोंधळ सुरू होता. कोकणात शिक्षक मतदार संघासाठी भाजपला उमेदवार मिळत नव्हता. भाजप आणि शिंदे गटाची युती असल्याने शिंदे गटाचे पदाधिकारी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना भाजपने पक्षाच्या चिन्हावर उमेदवारी जाहीर केली. तर महाविकास आघाडीने शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता.
गुलालाची उधळण करत एकच जल्लोष: शिक्षक, पदवीधर मतदार संघाची मतदान प्रक्रिया ३० जानेवारीला पार पडली. आज मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली. कोकणात बाळाराम पाटील आणि ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात कोण बाजी मारेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानुसार पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. बाळाराम पाटील यांना ९५०० तर ज्ञानेश्वर म्हात्रे यांना सर्वाधिक २० हजार आठशे मते मिळाली. म्हात्रे यांनी पाटील यांचा सुमारे ११३०० मतांनी पराभव केला. ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. फटाके फोडत पेढे वाटत आनंद साजरा केला.