मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून देशभरात कर्फ्यू लावण्यात आला आहे. लोकांना घराबाहेर पडू नका, गर्दी करू नका, असे सांगण्यात आले आहे. त्यानंतरही कोणतेही तातडीचे कामकाज नसताना स्थायी समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक रद्द करावी, अशी मागणी भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
देशभरात कर्फ्यू असताना पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन, बैठक रद्द करण्याची भाजपची मागणी - मुंबई महापालिका
देशात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत आढळून आले आहेत. कोरोनाचे राज्यात 125 रुग्ण आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुंबईसह महाराष्ट्रात आधी जमावबंदी व नंतर कर्फ्यू लावण्यात आला आहे. कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा सोडून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असताना पालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज (शुक्रवार 27 मार्च) आयोजित केली आहे.
देशात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत आढळून आले आहेत. कोरोनाचे राज्यात 125 रुग्ण आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुंबईसह महाराष्ट्रात आधी जमावबंदी व नंतर कर्फ्यू लावण्यात आला आहे. कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा सोडून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असताना पालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज (शुक्रवार 27 मार्च) आयोजित केली आहे. पालिकेच्या इतिहासात कर्फ्यूमध्ये पहिल्यांदाच स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कोणतेही तातडीने प्रस्ताव मंजूर करावे असे काम नाही. तरीही बैठक घेण्याचा स्थायी समिती अध्यक्षांचा दुराग्रह अनाकलनीय आहे, असे प्रभाकर शिंदे यांचे म्हणणे आहे.
बंद सभागृहातील स्थायी समितीच्या या बैठकीत किमान १०० व्यक्ती एकाच वेळेस हजर असतात. त्यापैकी एकजण देखील कोरोनाबाधित असेल तर त्याची लागण इतरांना होऊ शकते. अशा परिस्थितीत महानगरपालिका, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, आयुक्त, राज्य शासनाच्या परवानगीने स्थायी समितीची बैठक पुढे ढकलू शकतात. किंबहुना राज्य शासनाने कॅबिनेट बैठकांसह सर्व बैठका पुढे ढकलल्या आहेत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हव्दारे जनतेशी संपर्क साधत आहेत. अशा पार्श्वभूमीवर स्थायी समितीची बैठक घेण्यास आमचा विरोध आहे. तरी संबंधित बाबींची दखल घेऊन स्थायी समितीची बैठक रद्द करावी, अशी मागणी प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.