मुंबई - दिवसेंदिवस मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशात पालिका अपयशी ठरल्याचा आरोप करणाऱ्या भाजपच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयुक्त केंद्रीय सचिवांबरोबर व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे चर्चा करत असल्याने शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल व सुरेश काकाणी यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने कोरोनाबाबत सध्याची स्थिती व पावसाळ्यादरम्यान निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केल्याची माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.
भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली अतिरिक्त आयुक्तांची भेट, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या विविध मागण्या - भाजप शिष्टमंडळ न्यूज
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका उपायोजना करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप भाजपने केला. आज भाजपच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल व सुरेश काकाणी यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने कोरोनाबाबत सध्याची स्थिती व पावसाळ्यादरम्यान निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केला.
विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रसाद लाड, पालिकेतील भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, स्वीकृत नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान, मुंबईतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या व रुग्णालयातील बेड यामधली तफावत यावर चर्चा करून नव्याने बेड वाढवण्याची मागणी केल्याचे दरेकर यांनी सांगितले.
कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांना मूलभूत सुविधा द्यावी, कोरोना रुग्णांसाठी येत्या काळात ऑक्सिजन सिलिंडर लागणार आहेत, त्यांची तयारी पालिकेने करावी. मुंबईमधील मृत्यू थांबवता यावेत म्हणून व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेडची संख्या वाढवावी, कोरोनाबाधितांना बेड उपलब्ध व्हावे म्हणून डॅशबोर्ड सुरू करावा, खासगी रुग्णालयातील परिचारिकांना संपावर जाऊ नये म्हणून परावृत्त करावे, अशा मागण्या भाजपने केल्या आहेत. तसेच रुग्णालयात कोरोनाचे मृतदेह पडून असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात त्याप्रकरणी तातडीने कारवाई करावी, मुंबई भारताची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईमधील उद्योगधंदे मुंबईतच राहावे म्हणून पालिकेने प्रयत्न करावेत, कोरोना केअर सेंटर व रुग्णालयात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होईल याकरिता पालिकेने लक्ष द्यावे, पावसाळ्यात साथीचे रोग वाढत असल्याने त्याकडे पालिकेने लक्ष द्यावे, पावसाळ्यात झोपडपट्ट्यांमध्ये सॅनिटायझेशन करावे आदी मागण्या करण्यात आल्याचे दरेकर यांनी सांगितले. सत्ताधारी आपली जबाबदारी झटकू नाही शकत नाहीत. सरकारने कोरोनाबाबतची वस्तुस्थिती जनतेला सांगावी, असे आवाहन दरेकर यांनी यावेळी केले.