मुंबई :बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा काही भाग आवाज कुणाचा या पॉडकास्टवर प्रसारित करण्यात आला आहे. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर विरोधी पक्षाने देखील ठाकरे यांच्या मुलाखतीवर टीकास्त्र सोडले आहे.
विधान परिषदेत बोला :मी माझ्या वाढदिवसानिमित्त मुलाखत देताना माझा संकल्प काय आहे, हे नम्रपणे सांगतो. मात्र, आम्ही उद्धव ठाकरेंची मुलाखत पाहिली. तेव्हा उद्धव ठाकरे त्याच त्या गोष्टी परत बोलत होते, असा हल्लाबोल शंभूराज देसाईंनी ठाकरे यांच्यावर केला आहे. विरोधी पक्षात असताना त्यांचा राज्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? हे त्यांनी सांगायला हवे होते. ते एक दिवस विधान परिषदेत आले, तेथेही काहीच बोलले नाहीत. त्यांनी सूचना द्यायला हव्या होत्या. पण वर्षभरापासून त्याच त्या गोष्टी परत ते बोलत आहेत, अशी टीका देसाई यांनी ठाकरेंवर केली आहे.
फक्त सामना दैनिकालाच मुलाखत :उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्याकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. गेल्या वर्षभरापासून ते फक्त सामना दैनिकालाच मुलाखत देतात. राज्यात इतरही वृत्तपत्रे, वाहिन्या आहेत. तिथे त्यांनी बोलले पाहिजे. बाळासाहेबांचे विचार आम्ही काल, आज आणि उद्याही पुढे नेणार आहोत. आम्ही सरकारकडून जनतेला न्याय मिळवून देत आहोत. एकदा आम्ही एकत्र काम केले आहे. त्यामुळे आम्ही नेहमी एकमेकांना चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो अशी प्रतिक्रिया देसाई यांनी दिली आहे.