मुंबई - महानगरपालिकेत भाजपने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेऊन विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला आहे. मात्र, त्यांना हे पद देण्यास महापौरांनी नकार दिल्याने सभागृहात भाजपने गोंधळ घातला. सभागृहाला लागून असलेल्या भागात भाजपच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. यावेळी भाजप नगरसेवकांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष 25 वर्ष सत्तेत एकत्र होते. विधानसभेसाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची युती तुटल्यावर भाजप आता विरोधी पक्षात बसला आहे. पालिकेतही भाजपने विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला आहे. मात्र, २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत भाजपने विरोधी पक्ष नेते पद नको, असे सांगितल्याने काँग्रेसला विरोधी पक्ष नेते पद देण्यात आले आहे. यामुळे आता महापौरांनी भाजपचा विरोधी पक्ष नेते पदाचा दावा फेटाळला आहे.