मुंबई -राणीबागेतील पेंग्विनच्या पिलाला इंग्रजी नाव देण्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. ( Politics on Penguine in Rani Garden Mumbai ) भाजपाकडून केलेल्या आरोपाला महापौरांनी हत्तीचे नाव चंपा तर माकडाचे नाव चिवा ठेवू, असे प्रत्युत्तर दिले. याला भाजपाकडून पुन्हा प्रत्युत्तर देण्यात आले असून महापौर ठेकेदाराच्या कुरणावर जगणाऱ्या हत्ती असल्याची टीका करण्यात आली आहे. यामुळे येत्या काळात महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Mayor Kishori Pednekar ) आणि भाजपा यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
चंपा आणि चिवा नाव ठेवू -
मुंबईच्या राणीबागेत पेंग्विनच्या पिल्लाचे नाव ऑस्कर तर वाघाच्या बछडीचे नाव वीरा ठेवण्यात आले आहे. पेंग्विनच्या पिलाचे नाव इंग्रजी ठेवल्याने भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेवर टिका केली आहे. याला प्रत्युत्तर देताना भाजप टीका करतंय ना मराठी नावं ठेवायला हवी तर मग पुढच्या वेळी चंपा आणि चिवा नाव ठेऊ. हत्तीच्या पिल्लाला चंपा आणि एक माकडाचं पिल्लु पण येणार आहे त्याचं चिवा ठेऊ असा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. केवळ विरोधाला विरोध आणि खालच्या स्तरावरची टीका करणं सोडा, असा सल्लाही महापौरांनी भाजपा आणि चित्रा वाघ यांना दिला आहे.
ऑस्कर पुरस्कार चालतो -
भाजपच्या नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांनीही पेंग्विनच्या पिल्लाचे नाव ऑस्कर ठेवल्यावरून टीका केली आहे. याबाबत बोलताना राजश्री शिरवडकर बद्दल बोलणार नाही. बोलण्या एवढ्या त्या मोठ्या नाहीत. ऑस्कर पुरस्कार चालतो मग ते नाव का नाही. यांच्या टीकेला आता कधीच उत्तर देणार नाही. असे महापौरांनी म्हटले होते.