मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोणा विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी लस हाच एकमेव पर्याय आहे. कोरोनावरील लसीची चाचणी मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर रुग्णालयानंतर आता सायन रुग्णालयात ५ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. सायन रुग्णालयात भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेल्या 'कोव्हॅक्सिन' लसीची चाचणी केली जात आहे. या लसीचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो याचा अभ्यास सुरू आहे. त्यात भाजपाचे नगरसेवक नील सोमय्या यांनीही सहभाग घेतला आहे. अभ्यासासाठी स्वतःला लस टोचून घेणारे सोमय्या हे मुंबई महापालिकेतील पाहिले नगरसेवक ठरले आहेत.
स्वयंसेवक असलेले पहिले नगरसेवक -
सायन रुग्णालयात 'कोवॅक्सिन' लसीची चाचणी सुरू आहे. त्यासाठी स्वयंसेवक म्हणून नावे नोंदवण्यात आली. त्यात नगरसेवक असलेल्या नील सोमय्या यांनीही आपले नाव नोंदवले. नुकतीच निल सोमय्या यांना ही लस देण्यात आली. केंद्र सरकारच्या आयसीएमआरच्या नियमानुसार तयार झालेल्या 'कोवॅक्सिन' लसीच्या चाचणीमध्ये मुंबई महानगरपालिकेचा प्रथम नगरसेवक म्हणून मी सहभाग घेतला. सायन रुग्णालयात जाऊन 'कोवॅक्सिन' लस घेतल्याची माहिती नील सोमय्या यांनी दिली.
लसीचा अभ्यास सुरू -
चीनच्या हुआन प्रांतातून सुरू झालेल्या कोरोना विषाणुचा प्रसार जगभरात झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखता यावा म्हणून जगभरातील देशांमधून लसीचा शोध लावला जात आहे. अमेरिकामधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने 'कोव्हीशिल्ड' लसीचा शोध लावला असून त्या लसीची मानवी चाचणी सुरू आहे. या चाचणी दरम्यान या लसीचा मानवावर काही दुःपरिणाम होतात याचा सध्या अभ्यास सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात त्याची चाचणी करण्यात सुरू आहे.
सायनमध्येही चाचणी -
एकीकडे महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोव्हीशिल्ड लसीचा अभ्यास सुरू असतानाच पालिकेच्याच सायन रुग्णालयात भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची चाचणी सुरू करण्यात आली आहे. सायन रुग्णालयात एक हजार स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.
अशी दिली जाते लस -
भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस दिल्यावर त्या स्वयंसेवकाला किमान अर्धा तास रुग्णालयात विश्रांती करण्यासाठी सांगितले जाते. त्यावेळी त्या स्वयंसेवकावर देखरेख ठेवण्यात येते. त्यानंतर काही त्रास होत नसल्यास त्यांना घरी पाठवण्यात येते. स्वयंसेवक घरी गेल्यानंतरही डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे डॉ. एन. अवध यांनी सांगितले. दरम्यान, भारत बायोटेक कंपनीची कोवॅक्सीन लस देण्याआधी स्वयंसेवकाच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच लस देण्याआधी लसीबाबत संपूर्ण माहिती दिली जाते. यानंतर तो स्वयंसेवक तयार झाल्यास त्याची सही घेत लस दिली जाते, असेही त्यांनी सांगितले.
कोण आहेत नील सोमय्या -
भाजपाचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या यांचे नील सोमय्या हे चिरंजीव आहेत. 2017 मध्ये ते मुलुंड येथून भाजपाच्या चिन्हावर नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे ते सदस्य आहेत.