मुंबई- बेकायदेशीर पार्किंग केलेल्या वाहनधारकांकडून पालिका जास्त दंड आकारत आहे. मात्र, रस्ते आणि पदपथावर वावरणाऱ्या फेरीवल्यांकडून कमी प्रमाणात दंड आकाराला जातो. बेकायदेशीर पार्किंग प्रमाणेच दंडाची रक्कम वाढवल्यास रस्ते आणि पदपथ फेरीवाल्यांपासून मुक्त होतील, अशी सूचना भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी केली. त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे विधी समितीच्या अध्यक्षा शितल म्हात्रे यांनी सांगितले.
रस्ते, पदपथ, नाक्यावर फेरीवाले उभे असतात. मुंबईकरांना यातून मार्ग काढताना मोठे संकट उभे राहते. या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी पालिकेने धोरण तयार केले. परंतु, धोरणांची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. त्यामुळे फेरीवाले रस्ते आणि पदपथावर अतिक्रमण केले आहे. गर्दीच्यावेळी हे प्रमाण अधिक असते. पालिकेने त्यांच्यावर कारवाईसाठी खासगी कंपनीमार्फत 2 पाळ्यांत कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अभिजित सामंत यांनी विधी समितीच्या सभेत हरकतीचा मुद्द्याद्वारे केली.