महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून डमी उमेदवार रमेश कराडांचा अर्ज कायम, तर डॉ. अजित गोपछडेंची माघार - Maharashtra Legislative Council Election

विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी दाखल झालेल्या 14 अर्जापैकी 1 अर्ज बाद तर भाजपच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही डमी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे पक्के झाले आहे.

Assembly election
विधानपरिषद निवडणूक

By

Published : May 12, 2020, 4:58 PM IST

मुंबई- विधानपरिषद निवडणुकीत उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सुर उमटला होता. ही नाराजी काही प्रमाणात दूर करण्यासाठी भाजपने डॉ. अजित गोपछडे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर सोमवारी अर्ज दाखल केलेल्या रमेश कराड यांचा अर्ज कायम ठेवला आहे.

विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी दाखल झालेल्या 14 अर्जापैकी 1 अर्ज बाद तर भाजपच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही डमी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे पक्के झाले आहे.

विशेष म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये भाजपकडून रणजीतसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडाळकर, प्रविण दटके आणि डॉ. अजित गोपछडे या 4 उमेदवारांची विधानपरिषद निवडणुकीसाठी नावे जाहीर केली होती. त्यामुळे निवडणुकीत भाजपचे हे 4 अधिकृत उमेदवार असतील हे स्पष्ट झाले होते. मात्र, भाजपच्या यादीत घोषित झालेल्या डॉ. अजित गोपछडे या अधिकृत उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज माघे घेतला आहे. तर डमी उमेदवार रमेश कराड यांचा उमेदवारी अर्ज पक्षाकडून कायम ठेवण्यात आला आहे.

दिल्लीतून भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली होती. त्यात अजित गोपछडे यांच्या नावाचा समावेश असताना रमेश कराड यांनी उमेदवारी दाखल केली होती. परंतु, ऐनवेळी गोपछडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेवून राखीव उमेदवार रमेश कराड यांचा अर्ज कायम करण्यात आला आहे. सोबतच संदीप लेले यांनीही उमेदवारी मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. गोपछडे यांची उमेदवारी मागे घेण्यामागे वंजारी समाज नाराज असल्याने त्यांची नाराजी दूर करण्यासाठी रमेश कराड यांची उमेदवारी कायम केले असल्याचे सांगितले जात आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्र्यांसह अधिकृत 5 तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे 2 डमी उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. तर भाजपकडून 4 अधिकृत तर 2 डमी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. शिवाय शाहबाज राठोड या अपक्ष उमेदवारानेही उमेदवारी दाखल केली होती. मात्र, त्यांचा अर्ज आमदारांच्या सूचक व अनुमोदक म्हणून सह्या नसल्याने बाद करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून डमी अर्ज भरलेले किरण पावस्कर व शिवाजी गर्जे यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता विधानपरिषदेच्या 9 जागा बिनविरोध निवडूण येणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details