महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Balasaheb Thorat Resign : काँग्रेसच्या बुडत्या जहाजात कुणीही बसायला तयार नाही; थोरातांच्या राजीनाम्यावर बावनकुळेंची खोचक टीका - Chandrasekhar Bawankule reaction

काँग्रेस बुडते जहाज आहे व त्यात कोणी बसायला तयार नाही, अशी खोचक प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यानंतर दिली आहे. तसेच बाळासाहेब थोरात यांच्यासारखे लोक दुखावत असतील तर काँग्रेसने आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे देखील त्यांनी सांगितले.

Balasaheb Thorat Resign
चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधताना

By

Published : Feb 7, 2023, 5:00 PM IST

मुंबई : बाळासाहेब थोरात यांनी कॉंग्रेसच्या विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. यावरून कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यावरून कॉंग्रेसवर टीका केली आहे. ते म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांच्यासारखे ज्येष्ठ नेते ज्यांनी ९ वेळा विधिमंडळात प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेस वाढीसाठी प्रयत्न केले. पण पक्षात बाळासाहेब थोरात यांच्यासारखे लोक दुखावत असतील तर काँग्रेसने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. काँग्रेस बुडते जहाज आहे व त्यात कोणी बसायला तयार नाही,असे देखील ते म्हणाले. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात ते बोलत होते.

बाळासाहेब थोरातांचा राजीनामा : सत्यजित तांबे विधापरिषद निवडणूक प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून ते टोकाला पोहचले आहेत. त्यातच यापूर्वी नाना पटोले यांच्या विषयी तक्रार पत्र काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांना लिहील्यानंतर आज बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांवर अन्याय : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, बाळासाहेब थोरात यांनी आयुष्यात कधीच तडजोड केली नाही. काँग्रेस महाराष्ट्रात उभी करण्यास त्यांनी खूप काम केले आहे. माझ्यामुळे जर एखादा मोठा नेता नाराज असेल तर मला त्याच्याकडे जायला पाहिजे. पण बाळासाहेब थोरात नाराज असतील तर काँग्रेससाठी हा मोठा आत्मचिंतन करण्याचा विषय आहे. मी नाना पटोलेंना कुठलाही सल्ला देऊ शकत नाही. तो त्यांचा अधिकार आहे. काँग्रेस पक्षाला गळती लागेल की नाही माहीत नाही. पण काँग्रेसमध्ये बी व सी गटाचे सध्या कार्यकर्ते आहेत व काँग्रेसमध्ये मोठ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले : चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, आज मी इतकेच सांगेन २०२४ मध्ये महाविकास आघाडी पक्षाला उमेदवारसुद्धा भेटणार नाही. सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये येण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही. स्थानिक पातळीवर सत्यजित तांबे यांना भाजपने मदत केली त्यांना ऑफर नाही. पण त्यांना वाटले तर ते भाजपमध्ये कधीही प्रवेश करू शकतील. थोरात किंवा अजून कोणी असोत आमचे दरवाजे सर्वांसाठी उघडे आहेत. २०१४ ते २०२२ मध्ये जे जे कार्यकर्ते भाजपमध्ये आले. त्यांना त्यांच्या योग्य उंचीवर भाजपने बसवले आहे. थोरात छोटे नेते नाहीत की त्यांना भाजपकडून काही ऑफर दिली जाईल, असे बावनकुळे म्हणाले.

ब्राह्मण समाज नाराज नाही : कसबा पेठ व पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी अजूनही भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. परंतु महाविकास आघाडीकडून कुठलाही प्रतिसाद भाजपला भेटत नाही. याविषयी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडीकडून असा निरोप आला आहे की, टिळक यांना उमेदवारी का दिली नाही. आम्ही केंद्रीय बोर्डाला विनंती करू की जर महाविकास आघाडी ही निवडणूक बिनविरोध करायची असेल तर आम्ही टिळक कुटुंबातील उमेदवार देऊ. अंधेरी पूर्व निवडणूक आम्ही बिनविरोध केली. तसचं पिंपरी - चिंचवड मध्ये कोणाला उमेदवारी द्यावी हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. पण आमच्या पक्षात कसबा व पिंपरी - चिंचवड मध्ये एकदा निर्णय झाल्यावर कोणी बंडखोरी करत नाही, करणार नाही. तसेच ब्राह्मण समाज कुठेही नाराज नाही आहे. ते बॅनर कोणी लावले ते आम्हाला माहीत आहेत. आमच्या पक्षात असे होत नाही. जिथे जिथे पक्षाला वाटते की यांचं नेतृत्व योग्य आहे तिथे तिथे पक्ष योग्य नेतृत्वाला संधी देतो असेही बावनकुळे म्हणाले.

आदित्य ठाकरेंवर टीका : सागरी किनारा मार्गाअंतर्गत वरळी येथे पुलाच्या खांबांमधील अंतर वाढवून देण्याची मागणी शिंदे - फडवणीस यांच्या सरकारने केल्यामुळे त्यांचा सत्कार आज वरळी येथे केला जात आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे मोठे शक्ती प्रदर्शन असणार असून या सत्कारासाठी हजारो कोळी बांधव जमणार आहेत. या विषयावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, आज आम्हाला एकनाथ शिंदे यांना शक्ती प्रदर्शन करण्याची काही गरज नाही. आदित्य ठाकरे कोणी मोठा नेता नाही. पण आदित्य ठाकरे हे राष्ट्रीय नेते आहेत ते बिहार मधून सुद्धा निवडणूक लढतील, असा खोचक टोमणा बावनकुळे यांनी लगावला आहे.

वंचित नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश : वंचित आघाडीचे नवनाथ पडळकर व सहकारी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी बोलताना बावनकुळे म्हणाले की, मी त्यांचे मनापासून पक्षामध्ये स्वागत करतो. यांचा मान सन्मान व त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या राखल्या जातील, पूर्ण होतील. महाराष्ट्रातील वंचित घटक अजूनही सतेच्या प्रवाहापासून दूर आहे. भाजपमध्ये आल्याने आता त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मोठ्या प्रमाणामध्ये केले जाईल, असेही बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा : Balasaheb Thorat Resignation : बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला? राजकीय वातावरण तापले!

ABOUT THE AUTHOR

...view details