मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आमदारांची संख्या १५० च्या वर जाणार हे आता निश्चित झालं आहे. त्यानंतर आता भाजप प्रदेश कार्यालयात ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करत आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी बोलताना भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी गुजरातच्या संपूर्ण निकालाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला दिले आहे. (Gujrat election bjp celebration)
काय म्हणाले आशिष शेलार? : या प्रसंगी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, "गुजरातच्या जनतेचे जेवढे धन्यवाद करावेत तेवढे कमी आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला मिळणारी पसंती प्रत्येक निवडणुकी नंतर वाढते आहे. अमित शहा यांनी केलेल्या रणनीतीचा सुद्धा हा विजय आहे. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांनी संघटनेचे जे जाळे विनलेले आहे, त्याचे हे श्रेय आहे."
हिमाचलमध्ये टक्केवारी वाढणार :आशिष शेलार पुढे म्हणाले की, "अजूनही संपूर्ण निकाल समोर यायचा आहे. तो निकाल आल्यावरंच भाजप आपली प्रतिक्रिया देईल. पण गुजरात मध्ये जो काही कल दिसतो आहे तो देशातला विक्रम आहे. हिंदुस्तानात असा विक्रम मोदींच्या नेतृत्वात होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. हिमाचल मध्ये सुद्धा अजून अंतिम आकडेवारी यायची आहे. पण तिथे सुद्धा दिल्ली प्रमाणे आमच्या मतांची टक्केवारी वाढलेली असेल याचा आम्हाला विश्वास आहे."
राज्यात ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष..!
भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष बीड :आजच गुजरात आणि हरियाणा राज्याच्या निवडणुका पार पडल्या याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात राज्याचे असून त्यांनी गुजरात राज्यातील एकूण जागापैकी 154 जागावर जिंकल्या आहेत. त्यामुळे याचा परिणाम देशातील निवडणूक होईल का त्याचबरोबर बीड जिल्ह्यात 704 ग्रामपंचायतीच्या निवडणुका ही रणधुमाळी चालू असून याच्यामध्ये भाजपच्या ताब्यात किती ग्रामपंचायती येतील हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. येणाऱ्या काळात भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना कशा पद्धतीने या ग्रामपंचायती ताब्यात घेताय हे पाहणं अवचित त्याचं ठरणार आहे.
औरंगाबाद: गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने एक हाती सत्ता मिळवली विक्रमी असे उमेदवार निवडून आणल्याने राज्यभर भाजप पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. औरंगाबादच्या उस्मानपुरा भागातील भाजप पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला. फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. ढोल ताशाच्या गजरांमध्ये पदाधिकाऱ्यांनी ठेका धरात जल्लोष साजरा केला. आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये याचाच प्रत्यय राज्यभर दिसेल असा विश्वास शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी व्यक्त केला.
ठाणे :गुजरात विजयाचा जल्लोष आज ठाण्यात भाजपकडून करण्यात आला आहे. भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि शेकडो कार्यकर्ते त्यांच्यासोबत महिला नगरसेवक देखील सहभागी झाले होते. ढोल वाजून मिठाई वाटत आनंदाने नाचून भाजप कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा केला. हे सर्व श्रेय नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि स्थानिक कार्यकर्त्यांना दिले असल्याचे यावेळी दोन्ही भाजप आमदार सांगत आहेत.
नागपूर :नागपूरातही भाजप कार्यकर्त्यांनी गुजरातमधील विजयाचा जल्लोष केला. भाजप कार्यकर्त्यांनी टिळक पुतळा चौकात विजयाचा गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी केली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील विजय उत्सवात सहभागी झाले होते. आजचा विजय म्हणजे 2024 ला हिणार्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाची नांदी असल्याचं मत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.