महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई पालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून भाजपकडून प्रभाकर शिंदे, तर गटनेतेपदी विनोद मिश्रा - मुंबई पालिकेत 25 वर्षापासून शिवसेनेची सत्ता

मुंबई पालिकेत गेल्या २५ वर्षाहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. या काळात शिवसेनेचा भाजप हा मित्र पक्ष म्हणून होता. २०१४ मध्ये केंद्रात सत्ता येताच भाजपने मुंबईत पाय पसरायला सुरुवात केली. २०१७ मध्ये पालिकेची निवडणूक शिवसेना आणि भाजपा वेगळी लढली होती. यावेळी शिवसेनेचे ८५ तर भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर झालेल्या महापौरांच्या निवडणुकीवेळी भाजपने शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवाराला मतदान केले होते. त्यावेळी भाजपने विरोधी पक्षात न बसण्याची भूमिका घेतली होती. मात्र, आता ते विरोधी बाकावर बसणार आहेत.

Mumbai mahapalika
मुंबई पालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून भाजपकडून प्रभाकर शिंदे

By

Published : Feb 28, 2020, 11:01 AM IST

मुंबई - गेल्या २५ वर्षापासून मुंबई पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, आत्ता शिवसेना आणि भाजप यांची काडीमोड झाल्यावर भाजपने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात पालिकेत भाजपच्या बैठकीत गटनेतेपदी विनोद मिश्रा तर विरोधी पक्षनेते पदासाठी प्रभाकर शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र, पालिकेच्या नियमानुसार भाजपला विरोधी पक्षनेतेपद मिळणे सध्यातरी शक्य नाही. मात्र, वेळ पडल्यास आम्ही न्यायालयात जाऊ असा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे.

मुंबई पालिकेत गेल्या २५ वर्षाहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. या काळात शिवसेनेचा भाजप हा मित्र पक्ष म्हणून होता. २०१४ मध्ये केंद्रात भाजपची सत्ता येताच भाजपने मुंबईत हात पाय पसरायला सुरुवात केली. २०१७ मध्ये पालिकेची निवडणूक शिवसेना आणि भाजपा वेगळी लढली होती. यावेळी शिवसेनेचे ८५ तर भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर झालेल्या महापौरांच्या निवडणुकीवेळी भाजपने शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवाराला मतदान केले होते. त्याचवेळी भाजप पहारेकऱ्याची भूमिका पार पाडेल. भाजपा विरोधी पक्षातही बसणार नाही अशी भूमिका घेण्यात आली होती. त्याचवेळी काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद देण्यास भाजपने अनुकूलता दर्शवली होती. यामुळे पालिकेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता म्हणून रवी राजा यांची नियुक्ती झाली होती.

आता राज्यात भाजप आणि शिवसेनेची महायुती तुटल्यावर सेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन केले. त्यामुळे भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले आहे. राज्यात विरोधी पक्षात बसलेली भाजप आजपर्यंत पालिकेत शिवसेनेच्या सोबत होती. मात्र, आता पालिकेतही विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यासाठी आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार मनोज कोटक, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, महामंत्री कर्जतकर, आमदार सुनी राणे, प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांच्या उपस्थितीत पक्षाची एक बैठक झाली. या बैठकीत गटनेतेपदी विनोद मिश्रा तर विरोधी पक्षनेते पदासाठी प्रभाकर शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पालिकेत पक्षाच्या उपनेते पदी उज्वला मोडक व रिटा मकवाना यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.

वेळ पडल्यास कोर्टात जाऊ

खऱ्या अर्थाने भाजपा विरोधी पक्षाच्या मोडमध्ये गेली आहे. पहारेकऱ्यांच्या भूमिकेत नुसते राहून चालणार नाही. मुंबईचे रक्षण करणे, मुंबईकरांना सुविधा देणे यासाठी रस्त्यावर उतरण्याची आणि सभागृहात आवाज उठवण्याची भूमिका पालिकेने घेतली आहे. त्यासाठी पालिकेत अनेक वर्ष नगरसेवक असलेले प्रभाकर शिंदे यांच्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबादारी देण्यात आली आहे. ते त्या पदाला न्याय देतील असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले. प्रश्न कोणी पदावर चिकटणे किंवा सोडण्याचा नसतो, विरोधी पक्षनेतेपद हे संवैधानिक पद आहे. जो विरोधातील मोठा पक्ष असतो त्याचा विरोधी पक्षनेता जाहीर करावा लागतो. हा आमचा नैसर्गिक हक्क आहे. कायदा मोठा आहे. न्यायालयीन प्रक्रियेत कायदयात जे असेल त्याप्रमाणे होईल असे सांगत दरेकर यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

आम्ही काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद बहाल केले होते. काँग्रेसच्या विरोधीपक्ष नेत्यांनी आजपर्यंत विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका पार पाडलेली नाही. सत्ताधारी पक्षाने प्रायोजित केलेला काँग्रेसचा विरोधी पक्षनेता पालिकेत आहे. आम्ही विरोधी पक्षनेता पदासाठी महापौरांना पत्र दिले आहे. महापौर आपल्या सद्विवेक बुद्धीने निर्णय घेतील असे खासदार व पालिकेतील गटनेते मनोज कोटक यांनी म्हटले आहे.

कायद्यात जे असेल ते होईल - महापौर

शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालिकेचा चिटणीस विभाग यांचा सल्ला घेऊन कायद्यात जे असेल त्या प्रमाणे निर्णय घेतला जाईल असे महापौर म्हणाल्या. ५ मार्चला पालिकेचे सभागृह आहे. त्यात जे कायदेशीर असेल तेच केले जाईल, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

विरोधी पक्षनेतेपद भाजपला सध्या तरी नाही -

पालिकेच्या नियमानुसार एखाद्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिले असल्यास त्या पदावर इतर पक्षाने दावा केल्यास आधीचा पक्ष जोपर्यंत दावा सोडत नाही तोपर्यंत दुसऱ्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देता येत नाही. काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावरील दावा सोडल्यास किंवा काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्यास भाजपकडे आपोआप हे पद येऊ शकते. सध्या पालिकेत काँग्रेसकडे गटनेते पद आहे. काँग्रेसला या पदावरील दावा सोडावा लागेल किंवा पालिकेत महाविकास आघाडी झाल्यास काँग्रेसला सत्तेत सहभागी व्हावे लागेल तरच भाजपाला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details