मुंबई : विधान परिषदेसाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी 30 जानेवारीला निवडणुका होणार आहे. यासाठी कोकण शिक्षक मतदारसंघ, नाशिक-नागपूर शिक्षक मतदारसंघ, अमरावती पदवीधर मतदार संघ, नाशिक पदवीधर मतदारसंघ आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघसाठी या निवडणुका पार पडणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक व पदवीधर मतदार निवडणूकीसाठी भाजप व महाविकास आघाडीतर्फे रणनीती आखली जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना तर महाविकास आघाडी सरकारमधील घोळ समोर आला आहे.
निवडणूकीत भाजपची रणनीती सरस : 12 जानेवारीला उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस असल्याने नाट्यमय घडामोडी या दिवशी पाहायला मिळाल्या. खासकरून महाविकास आघाडीमध्ये असलेला तालमीचा अभाव निवडणुकीतून पुन्हा एकदा समोर येत आहे. याउलट भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत पुन्हा एकदा निवडणुकांसाठी रणनीती कशी तयार केली जाते, याचा उत्तम नमुना विरोधकांना दाखवून दिला आहे. या निवडणुकांमध्ये कोकण शिक्षक मतदार संघाची जागा शेतकरी कामगार पक्ष, नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदार संघाची जागा काँग्रेसला, औरंगाबाद शिक्षण मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला शिक्षक मतदार संघाची बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला देण्यात आली होती. मात्र जागा वाटपात अंतर महाविकास आघाडी आणि त्यांच्यासोबत असलेल्या संघटनांमध्ये एक मत होताना दिसत नाही.
सत्यजित तांबेंमुळे प्रश्न उपस्थित : नाशिक पदवीधर मतदार संघातून काँग्रेसला मोठा धक्का मिळाला आहे. काँग्रेसने उमेदवारी दिलेले सुधीर तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून शेवटच्या क्षणी फॉर्म भरला. सत्यजित तांबे हे भारतीय जनता पक्षाकडून नाशिकचे उमेदवार असतील अशा चर्चा गेल्या अनेक दिवसापासून रंगत होत्या. त्यातच शेवटच्या क्षणी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने भरला नसल्याने नेमकं काँग्रेसमध्ये काय सुरू आहे? याबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
महाविकास आघाडीतील विसंवाद : दरम्यान, नागपूर शिक्षक मतदार संघातही महाविकास आघाडीचा घोळ पाहिला मिळाला. ही जागा ठाकरे गटाला सोडली असली तरी महाविकास आघाडीसोबत असलेल्या इतर दोन शिक्षक संघटनांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुकांच्या अंतिम टप्प्यातही महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता नाही पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबोले व शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार गंगाधर नाकाडे हे निवडणूक लढवत आहेत.
भाजपची अगोदरपासून रणनीती तयार : विधान परिषदेच्या या पाच जागांसाठी भारतीय जनता पक्षाने काही महिन्यापासूनच रणनीती तयार केली होती. गेल्या महिन्यात सत्यजित तांबे यांच्या अनुवादित पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बर कार्यक्रमात सत्यजित तांबे यांच्यासारख्या हुशार नेत्यांवर आमचा डोळा असतो, असे म्हणत काँग्रेसला इशारा दिला होता. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पक्षाकडून नाशिक पदवीधर मतदार संघात उमेदवार देण्यात आलेला नाही. सत्यजित तांबे यांनी आपल्याकडे मदत मागितल्यास आपण त्यांना मदत करण्यासाठी तयार आहोत, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच आपण काँग्रेसचे उमेदवार असून निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडे मदत मागण्यासाठी जाणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी देखील जाहीर केले आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदार संघात काँग्रेसचा उमेदवारच उरलेला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीमुळे काँग्रेसची कोंडी तर झालीच आहे मात्र पक्षात सुसंवाद नसल्याचे देखील जगजाहीर झाला आहे.
काँग्रेसचे तांबेंवर कारवाईचे संकेत : तांबे पिता-पुत्राने शेवटच्या क्षणी असलेल्या घोळामुळे काँग्रेसची चांगलीच नाचक्की झाली आहे. नाशिक पदवीधर मतदार संघ काँग्रेसकडे असतानाही काँग्रेसचा उमेदवार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्यजित तांबे हे आपण काँग्रेसचे उमेदवार असल्याचे म्हणत असले तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजित तांबे काँग्रेसचे उमेदवार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. तांबे कुटुंबीयांनी काँग्रेसला दगा देण्याचे काम या निवडणुकीच्या माध्यमातून केले असल्याचीही खंत नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीचा भाजपला सवाल : राष्ट्रवादी काँग्रेसने देखील भारतीय जनता पक्षाने केलेल्या या रणनीतीदरम्यान प्रश्न उपस्थित केला आहे. भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार घोषित केला नाही. अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्मही कुणाला दिला गेला नाही. पाकळ्या मिटून घेण्याचे हे नवे ऑपरेशन कमळ म्हणावे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करून भाजपला विचारला आहे.
हेही वाचा :Nagpur Teacher Constituency Election : नाना पटोलेंच्या वक्तव्यामुळे संभ्रम, विदर्भ शिक्षक मतदारसंघात उमेदवारीचा घोळ कायम
महाविकास आघाडीचा पराभव ? : भारतीय जनता पक्ष कधीही कोणाचा करेक्ट कार्यक्रम करत नाही. मुळातच महाविकास आघाडी केवळ सत्तेसाठी एकत्र आली होती. त्यांच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये कधीही एक वाक्यता दिसली नाही. यादीही सत्तेत असताना विधान परिषद आणि राज्यसभेच्या झालेल्या निवडणुकीत त्यांना एकत्र येऊन सुद्धा यश मिळाले नव्हते. या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात होणाऱ्या निवडणुकीतही त्यांच्यामध्ये एक वाक्यता नसल्यामुळे त्यांचा पराभव नक्की आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गणेश हाके यांनी व्यक्त केले आहे.