महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ओबीसी आरक्षणावरील स्थगितीवरून भाजप आक्रमक; राज्यभर चक्काजाम आंदोलन

By

Published : Jun 26, 2021, 11:17 AM IST

Updated : Jun 26, 2021, 10:14 PM IST

मुंबईत भाजपा कार्यालयाबाहेर आंदोलनाला सुरूवात
मुंबईत भाजपा कार्यालयाबाहेर आंदोलनाला सुरूवात

22:11 June 26

कात्रज चौकात चक्काजाम आंदोलन; भाजपच्या 100 ते 150 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

आंदोलन करताना भाजपचे नेते

पुणे - ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून द्यावे या मागणीसाठी भाजपच्यावतीने आज पुण्यातील कात्रज येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे यांच्यासह माजी आमदार, नगरसेवक आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रकरणी आता पुणे पोलिसांनी आयोजकांसह भाजपच्या शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

16:29 June 26

सत्तेतील लोकांमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झालं : गिरीश महाजन

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द केले. त्यानंतर त्याचे तीव्र पडसाद आता राज्यात उमटू लागले आहेत. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असतानाच आता ओबीसींसाठी राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी भाजपने आंदोलन सुरू केले आहे. भाजपने आज सकाळपासूनच राज्यातील विविध भागामध्ये चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईतल्या भाजप प्रदेश कार्यालयात आंदोलनाला सुरुवात झाली.  

मुंबईत मंत्रालय परिसरातदेखील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यावेळी मंत्रालय परिसरात तणावाचे वातावरण झाले होते. या मोर्चात भाजपचे नेते गिरीश महाजन सहभागी झाले. ओबीसी समाजामध्ये आज प्रचंड रोष आहे. सरकारमध्ये कोणतीही एकवाक्यता नसल्यामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाले, असे गिरीश महाजन म्हणाले.

16:21 June 26

अठरापगड जातींना घेऊन आमदार गोपीचंद पडळकरांचे सांगलीत चक्काजाम आंदोलन

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

सांगली -ओबीसी समाजातील अठरापगड जातीच्या विविध भटक्या घटकांना घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली सांगलीमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आनंदोलनात लक्ष वेधलं ते भटक्या समाजातील घटकांनी. पारंपरिक वेशभूषा आणि वाद्यांच्या गजरात यावेळी आपली कला सादर केली. शहरातील पुष्पराज चौक याठिकाणी झालेल्या आंदोलनात आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

15:29 June 26

ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी धुळ्यात भाजपचे चक्काजाम आंदोलन

धुळे - ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा भाजपच्यावतीने चाळीसगाव चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले. तसेच महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. 

महाराष्ट्रात 57 टक्के ओबीसी समाज आहे. या समाजातील अनेक समाज बांधवांना सर्वच राजकीय पक्षातून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांमधून राजकीय प्रवासातून समाजसेवा करण्याची संधी मिळत होती. परंतु, न्यायालयात ही बाब न्यायप्रविष्ट असताना महाविकास आघाडी सरकारने न्यायालयापुढे योग्य माहिती दिली नाही. योग्य पद्धतीने बाजू न मांडल्यामुळे न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्याचा निकाल दिला असल्याचा आरोप करत धुळे जिल्हा भाजपच्यावतीने चाळीसगाव चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले.  

14:54 June 26

भाजपच्यावतीने दहिसर चेकनाक्यावर चक्काजाम आंदोलन

भाजपच्यावतीने दहिसर चेकनाक्यावर चक्काजाम आंदोलन

मुंबई -भाजपच्यावतीने ओबीसी आरक्षण प्रश्नावरून महाविकास आघा़डी सरकार विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात आले. मुंबईमध्ये उत्तर मुंबईच्यावतीने दहिसर चेकनाका याठिकाणी आंदोलन केले. राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही वेळासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. यासाठी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे, आमदार अमित साटम, आमदार विद्या ठाकूर यावेळी उपस्थित होते.

14:45 June 26

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पालघरमध्ये भाजपचे चक्काजाम आंदोलन

पालघर -ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्यावतीने पालघरमध्ये आंदोलन करण्यात आले. पालघरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत चक्काजाम आंदोलन केले. यावेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. चक्काजाम आंदोलन करणाऱ्या पालघर भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

12:43 June 26

'ओबीसीला आरक्षण दिले नाही, तर खुर्ची खाली करावी लागेल'; देवेंद्र फडणवीसांचा सरकारला इशारा

नागपूरात भाजपा आक्रमक

नागपूर- ओबीसी आरक्षणावर स्थगिती आल्यानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपाच्यावतीने राज्यभर चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणावर आलेल्या स्थगितीचा निषेध करण्यात येत आहे. नागपूरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. जर केंद्र आणि राज्य सरकारने ओबीसीला आरक्षण दिले नाही तर खुर्ची खाली करावी लागेल असा इशारा फडणवीसांनी सरकारला दिला आहे. 

12:41 June 26

मुंबईत दहिसर चेकनाक्यावर भाजपाचे चक्काजाम; वाहतूकीवर परिणाम

मुंबई- ओबीसी आरक्षणाबाबत भारतीय जनता पक्षाच्यावतीने ओबीसी आरक्षण विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईमध्ये उत्तर मुंबईच्यावतीने दहिसर चेकनाका याठिकाणी आंदोलन करून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत  चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी काही वेळासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. यासाठी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे, आमदार अमित साटम, आमदार विद्या ठाकूर, यावेळी उपस्थित होते.

12:38 June 26

रायगडमध्ये भाजपा रस्त्यावऱ; मुंबई गोवा महामार्ग रोखला

रायगड- ओबीसी आणि मराठा आरक्षणाकडे महाविकासआघाडी सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ आज राज्यभरात भाजपकडून राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावर भाजपाच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जवळपास अर्धा तास महामार्ग बंद होता.

12:04 June 26

कोल्हापूरात भाजपाचे चक्काजाम; चंद्रकांत पाटलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कोल्हापूर- ओबीसी आरक्षणाबाबत भाजपचे राज्यभरात चक्काजाम आंदोलन सुरु आहे. कोल्हापुरातही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थितीत चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.. पोलिसांनी चंद्रकांत पाटील यांना घेतले ताब्यात आहे. 

12:03 June 26

ओबीसींच्या आरक्षणासाठी वाशिमध्ये भाजपा उतरली रस्त्यावर

वाशिम- महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्त्या धोरणामुळे राजकीय आरक्षण गेले आहे. त्याच्या निषेधार्थ वाशिम शहरातील मधील पुसद नाका चौकात नांदेड-अकोला महार्गावर वाशिमचे भाजप आमदार लखन मलिक  यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

12:01 June 26

बारामतीत महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी....

बारामती- ओबीसी आणि मराठा आरक्षणाकडेे महाविकासआघाडी सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ आज राज्यभरात भाजपकडून राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून बारामतीत भाजपच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. बारामती शहरातील भाजप कार्यालयापासून हलगी नाद करत सदर चक्काजाम आंदोलन शहरातील तीनहत्ती चौकात ठिय्या मांडून करण्यात येत आहे .सदर आंदोलनात शहर व तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. आंदोलनादरम्यान महाविकासआघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.

12:00 June 26

पंढरी राज्य सरकार विरोधात जागरण गोंधळ आंदोलनाला सुरुवात

पंढरपूर- भारतीय जनता पार्टीकडून पंढरपूर येथील पंढरपूर-पुणे या मार्गावर जागरण गोंधळ करत सरकारविरुद्ध चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली. मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य ओबीसी आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारने अन्याय केला आहे त्यामुळे राज्य सरकारला जाग यावी म्हणून जागरण गोंधळ आंदोलनाला सुरुवात केली आहे.

11:59 June 26

ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यासाठी भाजपचे औरंगाबादच्या आकाशवाणी चौकात रास्तारोको

औरंगाबाद- ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यासाठी भाजपने आकाशवाणी चौकात रास्तारोको आंदोलन केले. जवळपास अर्धातास रस्ता रोको केल्याने काहीकाळ वाहतूक खोळंबा झाला होता. सरकार मधील ओबीसी नेते छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप खासदार डॉ भागवत कराड यांनी केली. आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.

11:19 June 26

पुण्यात भाजपा आक्रमक; पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा चक्काजाम आंदोलन

पुणे- ओबीसी समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणावर स्थगिती दिल्यानंतर भाजपाने राज्यभर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पुण्यातही आक्रमक झालेल्या भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी चक्काजाम केले आहे. या आंदोलनात भाजपा नेत्या  पंकजा मुंडे या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

11:17 June 26

हिंगोलीत भाजपाचे आंदोलन; ओबीसी आरक्षणाची मागणी

हिंगोली -ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यात आज (शनिवार) भाजपाच्यावतीने चक्का जाम आंदोलन केले जात आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलनाची तयारी सुरू आहे. आंदोलनात प्रत्येकावर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. थोड्याच वेळात आंदोलनाला सुरूवात झाली आहे.

11:02 June 26

मुंबईत भाजपा कार्यालयाबाहेर आंदोलनाला सुरूवात

मुंबई-  ओबीसी आरक्षणावर स्थगिती आल्यानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपाच्यावतीने राज्यभर चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणावर आलेल्या स्थगितीचा निषेध करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये भाजपाच्या राज्य प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.

Last Updated : Jun 26, 2021, 10:14 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details