मुंबई- महाराष्ट्रातील मंदिरे राज्य सरकारना भाविकांसाठी खुली, करावी या मागणीसाठी मुंबईतील वडाळा येथील राम मंदिर आणि विठ्ठल मंदिरासमोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी दार उघड उद्धवा दार उघड, अशी जोरदार घोषणाबाजी करत घंटानाद आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांना राज्यातील मंदिर उघडण्याची मागणी करण्यात आले आहे. यावेळी आमदार प्रसाद लाड, चित्रा वाघ यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कोरोनामुळे भाविक मानसिकदृष्या खचलेला आहे. सर्व समाजाला आपल्या आराध्य देवतेचे पूजन, दर्शन, प्रार्थना करुन मानसिक आधार मिळणे अपरिहार्य आहे. केंद्र शासनाने देवस्थाने सुरु करण्याबाबत 4 जून, 2020 रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार देशभरातील बहुसंख्य व प्रमुख देवस्थाने सुरू देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरू करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी महाराष्ट्र सरकारकडे खूप वेळा मागणी केली. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात मद्य दुकाने, मॉल, मांस विक्री सुरू झाली. मात्र, सर्व धर्मीय देवस्थाने बंद आहेत. सरकारला वारंवार मागणी करून देखील कोणतेही प्रकारचा प्रतिसाद हे सरकार देत नाही. त्यामुळे सरकारने त्वरित सर्व धार्मिक स्थळे उघडण्यासाठी परवानगी द्यावी, म्हणून आज (29 ऑगस्ट) भाजपकडून राज्यभर घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे.
अहमदनगर- शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपती मंदिरासमोर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन करत ठाकरे सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला. पक्षाचे राज्य पदाधिकारी अॅड. अभय आगरकर, शहर-जिल्हाध्यक्ष गंधे यांच्यासह कार्यकर्त्यांनी या आंदोलनात घंटा वाजवून सहभाग घेतला. यावेळी ज्या शिवसेनेचा जन्म हिंदुत्ववादातून झालेला आहे. त्या शिवसेनेचे सरकार आज राज्यात सत्तेत असताना मंदिर बंद ठेवणे हे मोठे दुर्दैव असल्याचे सांगितले.
शिर्डी (अहमदनगर) - राज्यातील मंदिरे उघडी करण्यासाठी शिर्डीतील साईमंदीर उघडण्यासाठीही भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे यांच्या उपस्थित भाजपकडून साई मंदिराजवळ घंटानाद आंदोलन करण्यात आले. राज्यात सरकारने दारूचे दुकाने तसेच मॉल उघडण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मंदिरे उघडण्यास परवानगी सरकार देत नाही. केवळ मंदीरे उघडल्यानेच कोरोनाचा फैलाव अ़धिक होतो का, असा सवालही विखे यांनी यावेळी उपस्थित केला.
अकोला- राज्य सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेला समर्थन करण्यासाठी शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंदिरे उघडण्यास तयार नसल्याचा आरोप अकोला भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांनी आज केला. शहरातील राम मंदिरासमोर सरकारविरोधात भाजपचे घंटानांद आंदोलन झाले यावेळी ते बोलत होते.
धुळे- राज्य सरकारने राज्यातील मंदिरे सुरू करावीत या मागणीसाठी भाजपच्या वतीने खान्देश कुलस्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप भाजपने यावेळी केला. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गोंदिया- आज गोंदियात भाजप व बजरंग दलाच्यावतीने सिव्हील लाईन परिसरातील जागृत हनुमान मंदिराच्या फाटकासमोर सरकारच्या विरोधात घंटानाद आंदोलन करण्यात आले.
हिंगोली- कोरोनाच्या परिस्थितीत दारूच्या दुकानांची दारे उघडी आहेत. तेथे दारू पिण्यासाठी गर्दी देखील होत आहे. मात्र, अशाच स्थितीत मंदिराची दारे बंद ठेवलेली आहे. ही दारे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात दार बंद असलेल्या शहरातील सराफा बाजारातील उत्तर मुखी हनुमान मंदिरा समोर घंटानांद आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये भाजप कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उद्धवा दार उघडा, दार, अशा घोषणा देण्यात आल्या.
जळगाव- जळगावातही भाजपने घंटानाद आंदोलन केले. मात्र, यावेळी मोजके नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले. तेही अवघ्या 15 मिनिटात आटोपण्यात आले. यावेळी जळगावचे आमदार सुरेश भोळे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापालिका गटनेते भगत बालाणी, स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे, सभागृह नेते ललित कोल्हे, माजी नगरसेवक सुनील माळी, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनाकडे भाजपच्या बड्या नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. काही धार्मिक संघटनांच्या सदस्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. हे आंदोलन अवघ्या 15 मिनिटात आटोपले. त्यामुळे आंदोलनाचा हेतू खरंच साध्य झाला का?, असा प्रश्न उपस्थित झाला.