मुंबई - भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली आहे. यात राज्यातील १६ जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. विद्यमान १४ खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर २ विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यात नितीन गडकरी, हंसराज अहीर, रावसाहेब दानवे, पूनम महाजनयासारख्या भाजपच्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
भाजपकडून अहमदनगर आणि लातूरच्या विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही. काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केलेल्या डॉ. सुजय विखे-पाटील यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर करून दिलीप गांधी यांचा पत्ता कट केला आहे. सोबतच लातूर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांच्या ठिकाणी सुधाकर श्रृंगारे हा एक नवीन चेहरा भाजपने दिला आहे. गांधी आणि गायकवाड यांचा अपवाद वगळता उर्वरित सर्व १४ विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यात आले आहे.
राज्यातील माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे बंड थंड करण्यासाठी त्यांची सून रक्षा खडसे यांनाच रावेरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. सुनेला तिकिट न मिळाल्यास एकनाथ खडसे हे काँग्रेसमध्ये जाऊ शकतात, अशी राजकीय चर्चा होती. खडसेंचे हे बंड निवडणुकीत न परवडणार होते. त्यामुळे खडसेंचे सतत पंख कापणाऱ्या भाजपने थोडी नरमाईची भूमिका घेत त्यांच्या सुनेलाच पुन्हा एकदा रावेरची उमेदवारी बहाल केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांना अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा तिकिट मिळाले आहे.