मुंबई - भायखळा येथील सुप्रसिद्ध राणीच्या बागेत गेल्या चार महिन्यात दोन पेंग्विनचा जन्म झाल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. पेंग्विनवरून राजकारण करणाऱ्या विरोधकांना ही एक चपराक असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, सध्या पेंग्विन कक्षात ३ प्रौढ नर आणि ४ प्रौढ मादी आणि दोन पिल्ल असे एकूण ९ पेंग्विन झाले आहेत. महापालिकेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत, प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ.संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, आदी यावेळी उपस्थित होते.
पेंग्विन कक्षात असलेल्या ७ पेंग्विनपैकी डोनाल्ड व डेसी या नर मादीच्या जोडीने दिलेल्या एका अंड्यामधून १ मे २०२१ रोजी एक पिल्लू जन्माला आले. तो नर असल्याने त्याचे नाव ओरिओ असे ठेवण्यात आले आहे. आता त्याचे वय चार महिने असून तो पालकांबरोबर इतर पेंग्विनसोबत चांगलाच रुळला आहे. तर मोल्ट व फ्लिपर या नर मादीच्या जोडीनेही दिलेल्या एका अंड्यामधून १९ ऑगस्ट २०२१ला नवजात पिलाला जन्म दिला आहे. तो खूपच नवजात असल्याने ते पिल्लू नर की मादी हे अद्याप समजू शकलेले नाही. ते पिल्लू घरट्याबाहेर रुळायला लागेल तेव्हा त्याची तपासणी केली जाईल, असे महापौर पडणेकर यांनी या सांगितले.
पेंग्विनवरून राजकारण -
मुंबईकरांना बर्फाळ वातावरणात राहणाऱ्या पेंग्विनचे दर्शन कृत्रिम बर्फाळ वातावरणात घडावे, या उद्देशाने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने राणीच्या बागेत २०१७मध्ये उत्तर कोरिया येथून ८ पेंग्विन आणण्यात आले होते. त्यापैकी एका पेंग्विनचा जंतूसंसर्गामुळे दुर्दैवाने मृत्यू झाला. विरोधकांनी यावरून सत्ताधारी शिवसेना आणि महापालिका प्रशासनावर सडकून टीका केली होती. आता राणी बागेतच पेंग्विनचा जन्म झाला आहे. त्यामुळे विरोधक आता काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.